अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

वाशी रेल्वे स्थानकालगत राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकालगत राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. राजेश ऊर्फ जुल्फिकार खान (२२) असे या आरोपीचे नाव असून या आरोपीच्या लैंगिक अत्याचारामुळे गर्भवती राहिलेली पीडित मुलगी रुग्णालयात प्रसूतीसाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

आरोपी राजेश हा मानखुर्द येथील मंडाळ भागात राहत असून तो वाशी परिसरात लहान मुलांसाठी लागणारी पुस्तके विक्री करत होता. पुस्तक विक्रीसाठी राजेश हा वाशीत येत असल्याने त्याची वाशी रेल्वे स्थानकाजवळ राहणाऱ्या १५ वर्षीय पीडित मुलीशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा उचलत आरोपी राजेश याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी राजेशने पलायन केले होते; मात्र पाच दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तिला प्रसूतीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे तेथील डॉक्‍टरांच्या लक्षात आले. त्यानुसार वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sexual abuse of a minor girl