कावळ्यांची नव्हे; मावळ्यांची चिंता करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

शरद पवारांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई : जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे काही पक्षांमध्ये गळती सुरू आहे; पण तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आपण सर्वांनी कावळ्यांची चिंता नव्हे; तर मावळ्यांची चिंता करायची, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. राज्यातील पूरस्थितीचा फटका बसलेल्यांच्या पुनर्वसनासाठी 20 ऑगस्टला पक्षातर्फे सरकारला निवेदन देण्यात येईल. सरकारने मदत केली तर ठीक; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला विभागाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत बोलताना पवार म्हणाले, देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा अन्यायावर मात करणारा आहे. त्यासाठी संघटना मजबूत असणे गरजेचे आहे. पक्षाला आणि देशालाही त्याचा फायदा होईल. राज्यात पूरस्थितीनंतर अनेक मदतीचे हात पुढे आले; मात्र आपल्या पक्षाने सर्वाधिक मदत केल्याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाहीत. त्यासाठी आपण पक्षांच्या संघटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. 
"विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्ष विचार करेल. विधानसभा निवडणुकीत तरुण आणि महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

नागपूर गुन्हेगारीचे केंद्र! 
महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेले नागपूर आज गुन्हेगारीचे केंद्र झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथलेच आहेत. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल आपण आवाज उठवायला हवा, असेही पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar advises party workers