सर्व पक्षांच्या नजरा पवारांकडे - नाईक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

बेलापूर - केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने नागरिकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नसून, नागरिकांची फसवणूक झाली आहे. अपेक्षांचा भंग करणारे राजकारण थांबविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवारांकडे सर्वच पक्षांच्या प्रमुखांच्या नजरा लागल्या असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी (ता. 17) आयोजित करण्यात आलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मेळाव्यात ते बोलत होते. आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

निवडणुकीचे काम नियोजनबद्ध सुरू असून, आघाडीचे उमेदवार नजीब मुल्लाच विजयी होतील, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या काळात विविध आरोप झाल्यावर ते सिद्ध होण्याआधीच राजीनामे दिले जात होते; परंतु या सरकारमध्ये खडसे सोडले, तर इतर मंत्र्यांवर झालेले आरोपाचे डाग घालवायला मुख्यमंत्री आहेतच, अशी टीका नाईक यांनी केली.

ही निवडणूक जिंकायची असून, कामाला लागण्याचे आदेश नाईक यांनी नवी मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतः मतदारांपर्यंत जावे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी सांगितले.

Web Title: sharad pawar ganesh naik politics