
Sharad Pawar : पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मराठा मंदिर अमृतमहोत्सवाचे दिले निमंत्रण
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या सत्तांतरानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. मराठा मंदिर, मुंबईस्थित संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सोहळ्याचे आयोजन संस्था करणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. असे शरद पवार यांनी या भेटीनंतर सांगितले. दरम्यान, या भेटीत मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याची शरद पवार यांची ही पहिलीच वेळ असल्याने शिंदे यांनी पवारांचे स्वागत करत त्यांना गणेशाची मूर्ती भेट दिली.
अदानी यांनी घेतली पवार यांची भेट
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यातही भेट झाली. गौतम अदानी यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.