
मुंबई : कितीही नाव कमावले आणि अनुभव पाठीशी असला तरी क्रिकेटमध्ये प्रत्येक जण कायमच विद्यार्थी असतो, कोणीही मास्टर नसतो, असे अनुभवाचे बोल महान फलंदाज सुनील गावसकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवले. निमित्त होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या संग्रहालयाच्या उद्घाटनाचे. भारतीय क्रिकेटची पंढरी समजली जाणारे मुंबई क्रिकेट आणि वानखेडे स्टेडियमची वास्तू येथे अनेक विक्रम आणि इतिहास घडलेले असले तरी मुंबई क्रिकेटचा गौरव नव्या पिढीसमोर दाखवण्यासाठी संग्रहालय नव्हते. आता वानखेडे स्टेडियमच्या वास्तूतच डिजिटल स्वरूपाचे कोंदण असलेले अद्ययावत संग्रहालय उभे राहिले आहे.