
"अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी व तरुण वर्ग ग्रंथालयाशी जोडला जाईल"
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात (Mumbai marathi grantha sangrahalaya) येणाऱ्या वाचकांसाठी नवीन सोईसुविधा, नव्या उपक्रमांचे (New facilities for readers) आयोजन करून तसेच अभ्यासिकेची सुविधा (library facility) वाचकांना दिल्यास त्यातून विद्यार्थी व तरुण वर्ग जोडला जाईल, त्यामुळे अशा सुविधा देण्याच्या सूचना आज संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी केल्या.
मुबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नवीन कार्यकारिणी, विश्वस्त व उपाध्यक्ष यांची संयुक्त बैठक आज संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली यशवंतरा़व चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी शरद पवार यांनी ग्रंथसंग्रहालयासमोरील अडचणी जाणून घेतल्या. व त्यावेळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात वाचकांसाठी नवीन सुविधा देण्याचा सूचना केल्या. तसेच यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे वाचकांचा ओघ वाढवता कसा येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, विद्या चव्हाण, शशी प्रभू प्रभाकर नारकर ,अमला नेवाळकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, विश्वस्त खा. सुप्रिया सुळे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, प्रताप आसबे, अरविंद तांबोळी आणि संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. यावेळी खा संजय संजय ,खा सुप्रिया सुळे यांनी आगामी काळात ग्रंथालय सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण उपक्रम घेण्याबाबतचे मार्गदर्शन केले. तर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मराठी भाषा व ग्रंथालय संवर्धनासाठी आर्थिक सक्षमीकरण महत्वाचे असून त्यासाठी सरकारची भूमिका महत्वाची ठरते अशी भूमिका मांडली.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव व मराठी संशोधन मंडळाचा अमृतमहोत्सव साजरा करते वेळी निरनिराळ्या उपक्रमांबद्दल कसा विचार करता येईल याबाबत संदर्भ विभाग कार्यवाह उमा नाबर यांनी सांगितले. प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे यांनी संस्थेच्या सर्वंकष विकासासाठी करता येणाऱ्या कामाची, उपक्रमाची माहिती दिली. प्रत्येक शाखा सक्षम करणेसाठी अभ्यासपूर्ण कृतीशील नियोजन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.आगामी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय महाराष्ट्रातील मराठी भाषिक अभ्यासक व वाचकांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सर्वतोपरी नियोजनबद्ध काम कार्यकारिणी करेल असा विश्वास कार्याध्यक्ष शीतल करदेकर व रविंद्र गावडे यांनी दिला.