शरद पवारांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडेंची राज्यातील 29 लाख दिव्यांगांना अनोखी भेट

शरद पवारांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडेंची राज्यातील 29 लाख दिव्यांगांना अनोखी भेट

मुंबई, ता. 11 : देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील 29 लाखांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे. 

दिव्यांग कल्याण आयुक्तालयमार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी 'महाशरद' हा डिजिटल प्लॅटफॉर्म 'ओएलएक्स' अँपच्या धर्तीवर तयार करण्यात आले असून उद्या (12 डिसेंबर) रोजी याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  जयंत पाटील यांच्या हस्ते एका कार्यक्रमात लोकार्पण करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

याचबरोबर सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे ई-बार्टी हे मोबाईल अँप तयार करण्यात आले असून, उद्या ( ता. 12) रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या लाईव्ह सोहळ्यामध्ये या पोर्टलचे व ई-बार्टी लोकार्पण करण्यात येणार असून या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री महोदय व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. 

दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तिप्रमाणे जीवन व्यथित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरी वर चालणारी व्हील चेअर असे दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही.

समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खाजगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात, या गरजू दिव्यांग व्यक्तींची व दात्यांची सांगड घालून देण्याचे काम महाशरद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार असल्याचे  मुंडे म्हणाले.

महाशरद प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ उद्या ( ता.12 ) रोजी सुरू होत असून मार्च -2021 अखेरपर्यंत मोबाईल ऍप्लिकेशन स्वरूपात देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती मुंडेंनी दिली.

महाशरद चा 'महाराष्ट्र सिस्टीम ऑफ हेल्थ रिहॅबिलिटेशन अँड असिस्टंस फॉर दिव्यांग' असा विस्तार असून खा. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याचे लोकार्पण करताना आपल्याला अत्यंत आनंद होत असून, या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून 29 लाख दिव्यांग व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही मुंडेंनी नमूद केले.

महाशरद हे डिजिटल प्लॅटफॉर्म पोर्टल उद्यापासून सुरू होत असून ते अँड्रॉइड ऍप्लिकेशन च्या स्वरूपात प्ले-स्टोअर वर  लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. 

विभागातील अधिकारी, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग वित्त महामंडळ यातील अधिकारी/कर्मचारी यांनी अत्यंत कमी वेळेत 'महाशरद' प्लॅटफॉर्म साकारला असून, याचे मोबाईल ऍप्लिकेशन मार्च 2021 पर्यंत प्ले-स्टोअर वर उपलब्ध होईल; मुंडे यांनी यासाठी त्यांचे कौतुक देखील केले आहे. 

12 डिसेंबर पासून गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छुक दात्यांना या पोर्टल वर नोंदणी करता येणार असून, कोणत्या प्रकारची मदत, सहाय्यक उपकरण किंवा अन्य सहाय्य आवश्यक आहे याबाबत दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार यावर सविस्तर वर्गीकरण देण्यात आले आहे.

गरजू दिव्यांग नागरिक व त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्या विविध सामाजिक घटकांना एकत्र करून मदत मिळवून देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

'ई-बार्टी' अँप उद्या होणार लाँच!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे मोबाईल अँप्लिकेशन तयार करण्यात आले असून, याचेही लोकार्पण उद्या (दि. 12) रोजी याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. ई-बार्टी (E-Barti) हे ऍप्लिकेशन प्लेअर स्टोअर वर उद्यापासून उपलब्ध होणार आहे.

या अँपमध्ये एम - गव्हर्नन्स सहित, बार्टीतील सर्व योजना, इ- लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती योजना आदी सर्व योजना एका क्लिकवर मोबाईल वरून हाताळता येणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, तक्रार निवारण, अभिप्राय आदी सुविधांसह विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे ऍप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

sharad pawars 80th birthday dhanjay munde to give gift to 29 lacs of handicapped citizens

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com