
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : राज्यात एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे मनोमिलन होताना दिसत असून शिवसेना शिंदे गटात यामुळे अशांतता पसरली आहे. त्यातच कल्याण मध्ये शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गटाचे मनोमिलन झाल्याचे पहायला मिळत आहे. बकरी ईदनिमित्त किल्ले दुर्गाडी येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते. सेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या स्वरूपात हे आंदोलन केले जाते. यंदा मात्र हे दोन्ही गट या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही गट एकत्र आले असून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत मंदिर सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.