आयारामांविरोधात शिवसेनेत असंतोष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनेत वाढलेल्या इनकमिंगमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ती नाराजी सोमवारी (ता. 30) घाटकोपरमध्ये उफाळून आली. भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले माजी नगरसेवक मंगल भानुशाली पंतनगर येथील शिवसेना शाखेजवळ पोहोचताच संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या फोडल्या. त्यांनतर या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर धाव घेतली. 

युती तुटल्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. त्याबद्दल पक्षातील स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच भाजपचे माजी नगरसेवक मंगल भानुशाली यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे समजते. त्यांना गरोडियानगर या भाजपच्या गडातून उमेदवारी देण्याची शक्‍यता होती; मात्र त्यांना पंतनगर येथील प्रभाग क्रमांक 131 मधून उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची कुणकुण स्थानिक शिवसैनिकांना लागली. भानुशाली यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिक संतप्त असतानाच ते शिवसेना शाखेसमोर पोहोचले. त्या वेळी काही सतंप्त शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्या फोडल्या. यामुळे त्यांनी तत्काळ तेथून काढता पाय घेतला. विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या पुढाकाराने भानुशाली यांना उमेदवारी मिळत असल्याची नाराजी स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मंगल भानुशाली तसेच विभागप्रमुख राऊत यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी घाटकोपर येथील सर्व शिवसैनिक रात्री उशिरा मातोश्रीवर गेले होते. 

Web Title: Shiv dissatisfaction