शिवसेना फसली भाजप सेफ!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

शिवसेनेने आयारामांना घेऊन इच्छुकांचे पंख छाटले, तर भाजपने उमेदवार नसलेल्या प्रभागातच दिली संधी...

मुंबई - मुंबईत ‘दादा’ ठरण्याच्या नादात झालेली घाई शिवसेनेला चांगलीच नडली आहे. उमेदवारांच्या रांगा असलेल्या प्रभागात बाहेरून उमेदवार आयात करणे शिवसेनेला महागात पडत आहे; तर भाजपने उमेदवारच नसलेल्या ठिकाणीच बाहेरून चेहरे आयात केले. त्यामुळे भाजपची खेळी सध्या तरी यशस्वी झाली असून शिवसेनेने ७० हून अधिक प्रभागांमधील विजयाची संधी गमावली आहे. 

मुंबईत शिवसेना-भाजप पहिल्यांदाच २२७ जागा स्वतंत्रपणे लढणार आहे. शिवसेनेकडे जवळजवळ प्रत्येक प्रभागात उमेदवार होते. काही मोजक्‍या प्रभागांमध्ये शिवसेनेकडे दमदार उमेदवार नाहीत. अशा परिस्थितीतही शिवसेनेने बाहेरून उमेदवार घेऊन त्यांच्याच इच्छुकांचे पंख छाटले. यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली. गुरुवारी सकाळपर्यंत शिवसेनेची हवा दमदार होती. त्यामुळे १० वर्षांपासून उमेदवार निवडून न आलेल्या ठिकाणीही यंदा भगवा फडकण्याची शक्‍यता आहे. काही प्रभागात पुन्हा ताकद दाखविण्याची संधी होती. अशाच प्रभागांमध्ये शिवसेनेने बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. असे तब्बल ७० हून अधिक प्रभाग आहेत, जेथे शिवसेनेला पुन्हा जम बसवता आला असता. शिवसेनेत नाराजी असताना भाजपची खेळी यशस्वी ठरली. भाजपने उमेदवार नाहीत, अशाच प्रभागात इतर पक्षांतील उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे अंधेरी आणि मुलुंड वगळता अन्य भागांमध्ये भाजपमध्ये नाराजी नाही. 

भाजपमधील नाराज
अधेरी पश्‍चिमेचे आमदार अमित साटम आणि वर्सोव्याचे आमदार भारती लव्हेकर यांनी स्वत:च्या नातेवाईकांसाठी तिकीट घेतल्यामुळे पक्षात नाराजी आहे. मुलुंडमध्ये शिवसेनेचे माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे भाजपचे आमदार सरदार तारासिंह यांच्या मुलाचा पत्ता कापल्याने ते नाराज आहेत.

Web Title: shiv sena bjp in bmc