फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये-दीपाली सय्यद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena deepali sayed criticize devendra Fadnavis

फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये-दीपाली सय्यद

डोंबिवली - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधत 'ए भोगी कुछ तो सीख हमारे योगी से' अशी टिका केली होती. यावर ''आता काय बोलायचे या गोष्टीला. फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. शिवसेना काही ऐकत नाही'' अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मी पुन्हा येईन हा तुमचा शब्द तसाच राहील असे देखील दिपाली म्हणाल्या. फडणवीसांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना त्या म्हणाल्या, आत्तापर्यंत राज हे कोठेच विजयी झाले नाहीत. औरंगाबाद येथील त्यांच्या सभेविषयी कोणीतही विजयी भव असे वक्तव्य केले असून त्यांना येथे तरी विजय मिळावा असा चिमटा त्यांनी काढला.महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कामगार संघटनेच्यावतीने कल्याण शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मशिदींवरील भोंग्याच्या वादावरुन सध्या राजकारण सुरु आहे. याविषयी त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात आपण हिंदू, मुस्लिम, शीख यांसारख्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात एकत्र नांदतात. सगळे सण आपण एकत्र साजरे करतो. राज यांनी जे काही वक्तव्य केले, त्यानंतर भोंग्यावरुन जी कहाणी सुरु झाली त्यानंतर अमरावतीवरुन राणा दाम्पत्य देखील त्यावर बोलते. कोण कोठे राहते आणि ते येऊन महाराष्ट्रावर कोसळतात. एबीसीडी प्रत्येकाची टिम, कोणाची टिम कोणती, कोण काय राजकारण करते, कशासाठी करते हे सगळे डोळ्यासमोर आहे. अमृता फडणवीस यांनी या वादावरुन थेट मुख्यमंत्र्याना लक्ष केल्यानंतर त्यावर दिपाली यांनी देवेंद्र फडणवीस यांना घरातील म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नका अशा कडव्या शब्दात टिका केली आहे.

त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, त्यांची सभा सक्सेस व्हावी यासाठी कोणीतरी विजयी भव असे सांगितले आहे. आजपर्यंत कोठेच विजय मिळाला नाही. येथे तरी त्यांना विजय मिळू दे. जे राजकीय, धार्मिक वाद होत आहेत याचा परिणाम हा तळागाळातील सर्वसामान्य जनतेवर होणार आहे. त्यामुळे आता लोकांनी विचार करायला पाहिजे की कोणाच्या सभांना किती गर्दी करायची, कोणाच्या सभा सक्सेस करायच्या असेही त्या म्हणाल्या.