
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. मुंडे यांच्याबाबत ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
मुंबई - सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेला आरोप हा वैयक्तिक आहे. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यांच्यावरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार नसल्याचा दावा शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हा राजकारणाचा मुद्दा नसल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. मुंडे यांच्याबाबत ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
शेतकरी कायद्याबाबत बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारकडे पाशवी बहुमत आहे. उलट कायदा मागे घेतल्याने त्यांची प्रतिमा उजळेल. हा माघार घेण्याचा प्रश्न नाही. त्यांनी समन्वय साधावा, तडजोड करावी. याचा केंद्र सरकारलाच फायदा होईल. यावेळी त्यांनी भाजपबाबतही भाष्य केले. राजकारणात कोणीच कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. आम्ही भाजपबरोबर 25 वर्षे एकत्रित काम केलेले आहे. आम्ही त्यांना विरोधक मानतच नाही. त्यांनी नेहमी गोड राहावे, गोड बोलावे आणि महाराष्ट्रालाही गोड दिवस यावेत, असे म्हणत भाजपला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा- आधी बायकोला प्रेमानं शेवटचं 'Hug', मग दिलं लोकलमधून ढकलून
सध्या शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांकडून होत असलेल्या कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असते. तेव्हा असे प्रसंग घडतच असतात. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यावर अशीच कारवाई झाल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.