'सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेने आत्मचिंतन करावं'; संजय राऊतांच्या प्रतिक्रियांवर फडणवीसांचे टीकास्त्र

तुषार सोनवणे
Wednesday, 11 November 2020

बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणं यात फडणवीसांचेही यश मानले जात आहे. बिहार निवडणूकीच्या निकालनंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई- बिहार विधानसभा निवडणूकांकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रातही या निवडणूकीच्या जोरदार चर्चा होत होत्या. महाराष्ट्रासाठी आणखी एक दुवा या निवडणूकीत महत्वाचा होता तो म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस! 

फडणवीस हे बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून प्रभारी म्हणून काम पाहत होते. बिहारमध्ये भाजपच्या संघटन आणि प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणं यात फडणवीसांचेही यश मानले जात आहे. बिहार निवडणूकीच्या निकालनंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा - मुंबईसह राज्यात थंडीचा लपंडाव; रात्री हुडहुडी दिवसा घामाघूम

'' बिहारमध्ये एनडीएला मिळालेला विजय हा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. कोरोनाच्या काळात मोदीजींनी गरिब आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सर्व ती आवश्यक पाऊले उचलली. बिहारी जनतेने एकमुखाने एनडीएवर विश्वास दाखवला आहे. बिहारने राजकिय दृष्ट्या खुप काही शिकायला मिळाले. त्याठिकाणी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न केले.'' असे फडणवीस म्हणाले.

बिहार निकालाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनेते दिग्विजय सिंह यांनी नितिश कुमार यांनी संघ आणि भाजपची साथ सोडावी असे म्हटले आहे. त्यावर फडणवीसांनी म्हटले की, दिग्वीजय सिंह हे देशातील मनोरंजन चॅनेल आहे. ते अशी वक्तव्ये करीत राहतात. त्यांच्या मताला महत्व देण्याचे कारण नाही. बिहारमध्ये मोदींनी नितिश कुमार यांना शब्द दिला आहे, की, निवडणूका जिंकल्यास तेच मुख्यमंत्री असतील.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न होईल, नितिश कुमार जास्त वेळ भाजप सोबत राहू शकणार नाही. असे म्हटले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत किंवा शिवसेना यांचे चित झालो तरी बोट वरती असणे ही वृत्ती आहे. बिहारमध्ये उद्धवजी जाणार, अदित्य जाणार संजय राऊत जोरदार प्रचार करणार असे म्हटले जात होते. शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते त्याठिकणी मिळाली. त्यामुळे दुसऱ्यांना सल्ले देण्याएवजी शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोदींनी उद्धव ठाकरे यांच्या संमतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल असे जाहीर केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात या मुद्यावर आम्ही ठाम होतो. नैतिकता सोडून दुसऱ्याशी युती करण्यात येते तेव्हा जनता उत्तर देते. बिहारमध्ये मोदींनी आधीच नितिश कुमार मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. त्यानुसार भाजप त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करेल. 

हेही वाचा - वारकरी आणि कोळी बांधवांचे प्रतिनिधी राज दरबारी दाखल; अडचणी आणि मागण्यांचा वाचला पाढा

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनतेत प्रक्षोभ आहे. अतिवृष्टी, पूर आदींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत उपलब्ध होत नाहीये. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही विरोधी पक्षात आहोत. ती सक्षमपणे भूमिका निभवणार, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena should introspect rather than give advice Fadnaviss commentary on Sanjay Rauts reactions