ही लाच देण्याची स्पर्धा कशी घेतली- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

"पालिकांना भ्रष्टाचारी ठरविणाऱ्या मंडळींनी यावर आता आपली दातखीळ उघडायला हवी. पैसे घेऊन रँकिंग वाटणाऱ्या केंद्रीय पथकाच्या अस्वच्छ कारभाराबद्दल पारदर्शकेतेचे डोस पाजायला कोणी पुढे येईल काय?
पंतप्रधान मोदी जगभरात 'मेक इन इंडिया’चा नारा देत असताना केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनीच त्याला असा हरताळ फासावा, याला काय म्हणावे?" असा टोलाही सेनेने लगावला आहे. 

मुंबई- "स्वच्छतेबाबत शहरांमध्ये स्पर्धा लागावी हा शहरांच्या रँकिंगमागील मुख्य उद्देश असल्याचे सुरवातीला सांगण्यात आले. मग केंद्राने नेमलेल्या कंपनीने शहरांमध्ये लाच देण्याची स्पर्धा कशी आयोजित करण्यात आली?" असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत औरंगाबादमध्ये तपासणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेच लाच मागितल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेच्या मुखपत्रातून 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. 

"पालिकांना भ्रष्टाचारी ठरविणाऱ्या मंडळींनी यावर आता आपली दातखीळ उघडायला हवी. पैसे घेऊन रँकिंग वाटणाऱ्या केंद्रीय पथकाच्या अस्वच्छ कारभाराबद्दल पारदर्शकेतेचे डोस पाजायला कोणी पुढे येईल काय?
पंतप्रधान मोदी जगभरात 'मेक इन इंडिया’चा नारा देत असताना केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनीच त्याला असा हरताळ फासावा, याला काय म्हणावे?" असा टोलाही सेनेने लगावला आहे. 

'केंद्रीय पथकाच्या नावाखाली शुक्रवारी औरंगाबादमध्ये आल्यापासून या कंपनीच्या अधिकाऱयांनी धुमाकूळ घातला होता. देशातील बडे अधिकारी, मंत्री, न्यायमूर्ती औरंगाबादमध्ये येतात, तेव्हा सुभेदारी विश्रामगृहात मुक्कामी थांबतात. मात्र या सुरती अधिकाऱ्यांनी पंचतारांकित हॉटेलचीच मागणी केली. पालिकेने त्यांचे तेही लाड पुरवले. मग त्यांनी 20 हजार रुपये किंमत असलेल्या 'इम्पोर्टेड' दारूची मागणी केली आणि पाचशे रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटचे पाकीट मागितले,' असे सांगत 'सामना'तून मोदी सरकारच्या प्रशासनावर कोरडे ओढण्यात आले आहेत. 
 
Web Title: shiv sena slams modi govt over swachh bharat's corrupt squad