चक्रम वादळापासून सावध राहा, शिवसेनेनं राज्यपालांना दिला सल्ला

चक्रम वादळापासून सावध राहा, शिवसेनेनं राज्यपालांना दिला सल्ला

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आजच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजप नेत्यांना चक्रम वादळाची उपमाही देण्यात आली आहे. राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरून मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरू आहे. राज्यपालांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही 'चक्रम' वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते राजभवनात जाऊन वारंवार राज्यपालांची भेट घेत आहेत. यावरुन अग्रलेखात टीका केली आहे. अमेरिकेत पोलिसांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. एक दिवस संतप्त विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर येतील आणि घोळ घालून एक पिढी बरबाद करणाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्यांना सुनावतील, तुमच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आमचा छळ का करता? बोलण्यासारखे, करण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात 

कोरोना संकटात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार म्हणून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी-पालक आणि शिक्षण तज्ञांनी याचे स्वागत केले. मात्र प्रत्येक बाबतीत विरोधच करायचे, असे ठरवून काम करत असलेल्या विरोधी पक्षाने तात्काळ राजभवन गाठले आणि परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला. विरोधकांचे पत्र मिळताच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणारे पत्र लिहिले. 

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक बाबतीत विरोधच करायचे असे ठरवून काम करीत असलेल्या विरोधी पक्षाने तत्काळ राजभवन गाठले आणि या निर्णयावर आक्षेप घेतला. विरोधकांचे पत्र मिळताच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयास विरोध करणारे पत्र लिहिले आणि प्रसिद्धीमाध्यमांना जाहिरही केले. 

राज्यपाल महोदयांचे म्हणणे असे की, विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा व्हाव्यात. परीक्षा व्हायला हव्यात आणि परीक्षा घेऊ असे राज्यपालांनीच सांगितले. एका अर्थाने जिंकू किंवा मरू असाच आवेश त्यांनी आणला आहे, पण जिंकायचे कोणासमोर आणि मारायचे कोणाला, हे सुद्धा एकदा समजून घेतले पाहिजे.

देशभरात अनेक ‘बडे लोग’ बोगस डिग्री घेऊन राजकारणात वावरत आहेत. ‘कोरोना ग्रॅज्युएट’ होण्यापेक्षा हे बोगस पदवीवले डेंजर. ही यादी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे, असा टोलाही सामनाच्या अग्रलेखात लगावला आहे.

कायदा फक्त विद्यापीठालाच नाही, इतर क्षेत्रांनाही लागू आहे. कायद्यानेच कोणी वागायचे म्हटले, तर जनता साखरझोपेत असताना महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवून एक बेकायदा शपथविधी पार पडला नसता, असा टोमणाही अग्रलेखात मारण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पंतप्रधानांप्रमाणे काही निर्णय संकटकाळी घेतले जात असतील तर अशा प्रत्येक निर्णयात विरोधी पक्षाने आडवी टांग टाकायची व त्या टांगेस राज्याच्या घटनात्मक प्रमुखांनी ‘मम’ म्हणत आशीर्वाद द्यायचे हेच मुळी नियमबाह्य आहे. अशा कितीही टांगा टाकल्या तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही.

एरव्ही राज्यपाल अधिकाऱ्यांना वगैरे बोलावून त्यांच्या त्या आढावा बैठका की काय त्या घेतच असतात व समांतर सत्ता केंद्र चालवीत असतात. मग अंतिम वर्षाच्या परीक्षाप्रश्नीही विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसह सगळ्यांना बोलावून विषय समजून घेता आला असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com