ठाणे पालिकेच्या प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व, उमेदवारांची बिनविरोध निवड

राजेश मोरे
Wednesday, 11 November 2020

प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपल्याने निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या उमेवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

ठाणे : महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती सभापतीपदासाठी बुधवारी (ता. 11) अर्ज दाखल करण्यात आले असून या सर्व सभापतीची निवड देखील बिनविरोध झाली आहे. यामध्ये सहा प्रभाग समित्यांवर शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून एका प्रभाग समिती सभापतीवर कॉंग्रेस तर दोन प्रभाग समित्यांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपल्याने निवडणूकीसाठी तीनही पक्षांच्या उमेवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

हेही वाचा : नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार

गेल्या कार्यकाळाप्रमाणे या या कार्यकाळात देखील प्रभाग समिती सभापती पदांसाठी महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून कळवा प्रभाग समिती सभापतीपदासाठी वर्षा मोरे तर उथळसर प्रभाग समिती सभापतीसाठी वहिदा खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेकडून वागळे प्रभाग समितीसाठी एकता भोईर, दिवा प्रभाग समितीसाठी सुनीता मुंडे, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी राधिका फाटक, लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समितीसाठी आशा डोंगरे, नौपाडा -कोपरीप्रभाग समितीसाठी नम्रता फाटक, तर माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीसाठी भूषण भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंब्रयात कॉंग्रेसच्या दीपाली भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

नक्की वाचा : यंदा फटाक्यांवर संक्रांत, मश्जिद बंदरमधली फटाक्यांची दुकाने रिकामीच

स्थायी आणि परिवहन समितीवरही शिवसेना 

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनीच एकमेव अर्ज दाखल केल्याने बुधवारी (ता. 11) त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्बत झाले आहे. तसेच परिवहन समिती सभापतीपदी देखील शिवसेनेच्याच विलास जोशी यांची निवड निश्‍चित झाली असून त्यामुळे स्थायी आणि परिवहन समिती अशा दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Shiv Sena win ward committees of Thane Municipal Corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena win ward committees of Thane Municipal Corporation