
वचपा घेऊच, पहिले तब्येतीची काळजी घ्या; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकाला फोन
डोंबिवली - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक तथा कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळी हल्ला झाला. शिंदे समर्थक गटाने हा हल्ला केल्याचा आरोप पालांडे यांनी केला आहे. शिवसैनिकावर हल्ला झाल्याचे समजताच थेट मातोश्री वरून उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांच्याशी संपर्क साधून तब्येतीची विचारपूस केली. आमच्यावर हल्ला झाला तरी आम्ही शिवसैनिक ठाम आहोत, तुमच्या पाठीशी आहोत असे पालांडे यांनी सांगताच, आधी बरे व्हा...बाकी काळजी करू नका असा पित्याप्रमाणे सल्ला पालांडे यांना दिला. उद्धव यांचा फोन आल्याने शिवसैनिकांची पक्षाप्रती निष्ठा आणखी दृढ झाली असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक हर्षवर्धन पलांडे यांच्यावर बुधवारी सकाळी चार ते पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती पक्षप्रमुख ठाकरे यांना समजताच त्यांनी तातडीने पालांडे यांची दूरध्वनी वर विचारपूस केली. तब्येत कशी आहे आता असे विचारताच पालांडे यांनी मी बरा आहे साहेब असे सांगितले. घाबरत नाही पण अचानक हल्ला झाल्याने तेथून पळालो असे पालांडे यांनी उद्धव यांना सांगताच त्यांचा आपण नंतर पाहू बरोबर आधी तुम्ही बरे व्हा असा सल्ला दिला. मी तुम्हाला भेटायला येईल असे आश्वासन देखील ठाकरे यांनी यावेळी पालांडे यांना यावेळी दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कल्याण पूर्वेतील बहुतांशी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. पालांडे यांनी आपण निष्ठावान शिवसैनिक असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे मध्ये शिंदे समर्थक गटाचा ठाकरे समर्थक गटावर दबाव वाढत असताना कल्याण डोंबिवली मध्ये देखील हे दबाव तंत्र वापरले जात आहे का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही मारहाण म्हणजे दबाव तंत्राचा भाग असण्याची शक्यता ठाकरे समर्थकांकडून वर्तविण्यात येत आहे.
Web Title: Shiv Sena Worker From Uddhav Thackeray Group Attacked Eknath Shinde In Kalyan Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..