मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्‍वनाथ महाडेश्‍वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

विश्वनाथ महाडेश्वर आणि कॉंग्रेसचे विठ्ठल लोकरे यांच्यात ही लढत होती. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे महाडेश्‍वर यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. 

मुंबई - मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी विजय मिळविला असून, भाजपनेही शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. महाडेश्वर यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी महापालिकेबाहेर जल्लोष केला.

विश्वनाथ महाडेश्वर आणि कॉंग्रेसचे विठ्ठल लोकरे यांच्यात ही लढत होती. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे महाडेश्‍वर यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन महापौरांची खुल्या बसमधून पालिका मुख्यालयापासून हुतात्मा चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले होते, त्याप्रमाणे ठाकरे नवीन नगरसेवकांसह हुतात्म्यांना वंदन करणार आहेत. 

भाजपने महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महापौर निवडणुकीतील चुरस संपली होती. 84 नगरसेवकांसह चार अपक्ष मिळून शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ 88 झाले. भाजपचे अखिल भारतीय सेना आणि अपक्ष मिळून 84 संख्याबळ आहे. महापौरपदासाठी शिवसेनेचे महाडेश्‍वर आणि कॉंग्रेसचे उमेदवार लोकरे यांच्यात तसेच उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर आणि कॉंग्रेसच्या विनी डिसोझा यांच्यात लढत होती.

Web Title: Shiv Sena's Vishwanath Mahadeshwar is the elected Mayor of Mumbai