पराभवाच्या भीतीमुळेच भाजपला युतीची आठवण : सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

शिवसेनेला अपशकुन करणारे छगन भुजबळ तुरुंगात गेले. नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झालेत; तर गणेश नाईक घरात बसलेत अशा भाषेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना सोडून गेलेल्या छगन भुजबळ, नारायण राणे व गणेश नाईक यांची खिल्ली उडवली. या तिन्ही नेत्यांची अवस्था पाहून आता कोणी शिवसेना संपविण्याची भाषा व धाडस करणार नसल्याचे ते म्हणाले.

बेलापूर : आगामी काळातील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा आत्मविश्‍वास डगमगला आहे. अपयशाची भीती वाटल्याने कालच्या (ता. 6) भाजप मेळाव्यात एनडीए एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ही टीका शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नेरूळ आगरी कोळी भवन येथे शनिवारी (ता. 7) झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केली आहे. आगामी काळातील निवडणुका शिवसेना पक्ष स्वतंत्ररीत्या लढणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. याबाबत ठरावही झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्गपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. नवी मुंबईतील नेरूळ येथील मेळावा त्याचाच एक भाग होता. या वेळी देसाई यांनी भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांचा समाचार घेतला. शिवसेना डोळ्यांसमोर निवडणुका ठेवून कधीच काम करीत नाही. नवी मुंबई शहरात शिवसेना वाढविण्याचा सल्ला या वेळी देसाई यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा, विधानसभा यासह पालिकेच्या एकत्रित निवडणुकांनाही शिवसेना तयार असल्याचे सांगितले. शिवसैनिक जिवंत असेपर्यंत ठाण्यामध्ये कोणालाही सत्ता मिळणार नसल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीत 50 हजार मतांचे मताधिक्‍य नवी मुंबईतून मिळाले. बेघर होण्याची वेळ आलेल्या दिघ्यातील नागरिकांच्या मदतीला सर्वांत आधी शिवसेनाच मदतीला धावली. नवी मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांचा आलेख वाढत आहे. क्‍लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिकेप्रमाणे नवी मुंबईतही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नियमावली बनविण्यात यावी, असे सांगत या शहरातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. 

भाजपकडून नागरिकांना जीआर निघाल्याचे सांगून प्रश्न सोडविल्याचे सांगत मूर्ख बनविण्यात येत असल्याचा आरोप उपनेते नाहटा यांनी केला. नवी मुंबई महापालिकेत युती करून फसल्यामुळे प्रत्येक वेळी तोंडघशी पडावे लागत असल्याचे ते म्हणाले. या मेळाव्याला विठ्ठल मोरे, नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नामदेव भगत, मनोहर गायखे, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवसेना संपविणारे संपले 

शिवसेनेला अपशकुन करणारे छगन भुजबळ तुरुंगात गेले. नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झालेत; तर गणेश नाईक घरात बसलेत अशा भाषेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना सोडून गेलेल्या छगन भुजबळ, नारायण राणे व गणेश नाईक यांची खिल्ली उडवली. या तिन्ही नेत्यांची अवस्था पाहून आता कोणी शिवसेना संपविण्याची भाषा व धाडस करणार नसल्याचे ते म्हणाले. 

हल्ले रोखण्यास दक्षता पथक 

वाढत्या हल्ल्यांमुळे महिलांसह रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत. यापूर्वी असे प्रकार झाले, तेव्हा बाळासाहेबांनी महिलांना रामपुरी बाळगण्यास सांगितले होते, अशी माहिती देसाई यांनी दिली. शिवसैनिकच हल्लेखोरांना वठणीवर आणू शकतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांवरील हल्ले रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने दक्षता पथक नेमण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

Web Title: Shivesena Leader Subhash Desai Criticizes BJP