अंबरनाथला शिवमंदिर कला महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

महोत्सवातील कार्यक्रम (कार्यक्रमाची वेळ कंसात) 
 शुक्रवार (ता. ५) ः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव- सायंकाळी ५, गायक राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर- सायंकाळी ७.
 शनिवार (ता. ६) ः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सुहास बहुलकर- सायंकाळी ५, गायक रूपकुमार राठोड आणि गायिका सोनाली राठोड सायंकाळी ७.
 रविवार (ता. ७) ः भगवान रामपुरे- सायंकाळी ७, गायक सलिम आणि सुलेमान सायंकाळी ७.

अंबरनाथ - येथे शुक्रवार (ता. ५)पासून रविवार (ता. ७)पर्यंत शिवमंदिर कला महोत्सव होणार आहे. महोत्सवात स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे, रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड, सलीम आणि सुलेमान आदी ख्यातनाम गायक कलाकार या प्रसिद्ध गायकांच्या कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी रसिकांना मिळणार आहे. प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात होणाऱ्या या कला महोत्सवाचे उद्‌घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच येथे दिली.

दर वर्षी जानेवारीत महोत्सव होणार आहे. यंदाच्या महोत्सवात कलादालन, खाद्यसंस्कृती, शिल्पकला, हस्तकला, लहान मुलांसाठी विविध साहस स्पर्धा होणार आहेत. महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शिवमंदिर परिसर सुशोभीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जास्तीत जास्त रसिकांना या महोत्सवाचा आनंद मिळावा, यासाठी प्रेक्षक गॅलरीसह आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. रोज दुपारी ४ ते रात्री १० दरम्यान कार्यक्रम होतील. महोत्सवास युवा सेनेचे आदित्य ठाकरे, जिल्हासंपर्कप्रमुख पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. उत्कृष्ट तबलावादक आजेस आदिया, सुलेखनकार अच्युत पालव, सतारवादक भूपाल पणशीकर, शिल्पकार आनंद प्रभूदेसाई महोत्सवात सहभागी होणार आहेत. नऊ वर्षीय तबलापटू अथर्व लोहार याचे तबलावादन होणार आहे. शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार तीन दिवसांच्या कालावधीत कला महोत्सवाला भेट देणार आहेत. यंदा लहान मुलांसाठी रॅपलिंग, रॉक वॉक यासह हस्तकला, चित्रकृती आणि शिल्पकृतीचे प्रदर्शन, विक्री होणार आहे. चित्र आणि शिल्प प्रदर्शनातील वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, विजय पवार या वेळी उपस्थित होते. 

Web Title: Shivmandir Kala Mahotsav in ambernath