तणावपूर्ण वातावरणात शिवसैनिक अयोध्येत दाखल 

तणावपूर्ण वातावरणात शिवसैनिक अयोध्येत दाखल 

ठाणे - अयोध्येकडे जाण्यासाठी ठाण्यातून निघालेल्या शिवसैनिकांची रेल्वे फैजाबाद येथे गुरुवारी रात्री 11च्या सुमारास दाखल झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी धर्मशाळा अथवा हॉटेलकडे मोर्चा वळविला; मात्र या वेळी शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचा अनुभव घ्यावा लागला. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे येणार असल्याने त्यांच्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात निवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा राबवली गेली आहे. त्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेलचा आसरा घेण्यात आला आहे. यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिकांना रूम शेअरिंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या शिवसैनिकांना झोपण्याकरिता गाद्या मिळविण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. तेथे थंडीचा कालावधी असल्याने शिवसैनिकांना गाद्या आणि चादरी मिळवून देण्यासाठी यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री अयोध्येत पोहोचलेले शिवसैनिक उद्या दुपारी शरयू नदीच्या किनारी जमा होणार आहेत. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साधू संताची भेट झाल्यानंतर शरयू नदीच्या किनारी महाआरती केली जाणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात शिवसैनिकांकडून सर्व रामाच्या मंदिरामध्ये अथवा शहरातील प्रमुख मंदिरात सायंकाळी 6 वाजता महाआरती केली जाणार आहे. 

एकनाथ शिंदे यांची यशस्वी मध्यस्थी 
काही वर्षांपासून उत्तर भारतीयांवर मुंबई, ठाण्यात होणारे हल्ले, छटपूजेला विरोध या सर्व गोष्टींना शिवसेनाच जबाबदार आहे. त्यामुळे संयुक्त व्यापारी मंडळाने शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत होणाऱ्या महासभेला काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तत्काळ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांनी आजपर्यंत उत्तर भारतीय समाजासोबत कायमच शिवसेना असल्याचे आश्वासन देतानाच त्यांना केलेल्या सहकार्याची माहिती दिली. ही शिष्टाई यशस्वी झाल्यानंतर संयुक्त व्यापारी मंडळाने उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याने दिली. या उलट एकनाथ शिंदे यांनी सुचविल्याप्रमाणे संबंधित व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ उद्धव यांचे अयोध्येत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदे आणि संजय राऊत शीतयुद्ध 
राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या गाठण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिवसेनेतील चाणक्‍यांनी हा विषय खास लावून धरला होता; मात्र त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रामुख्याने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव यांनी सोपवली होती. संघटनात्मक बांधणीमध्ये हातखंडा असल्याने ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती; पण मुळात हा विषय लावून धरण्यात राऊत यांचा पुढाकार असताना शिंदे यांचे महत्त्व वाढल्याने येथे शिंदे आणि राऊत असे दोन गट पडल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com