Loksabha 2019 : मुंबईच्या जागा जिंकताना युतीची दमछाक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 एप्रिल 2019

सत्तेसाठी युतीच्या तलवारी म्यान 
गेल्या दीड-दोन वर्षांत मुंबईत असंख्य ठिकाणी लागलेल्या आगीत सर्वसामान्यांना प्राण गमवावे लागले होते. तसेच अंधेरी आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांच्या दुर्घटनेतही अनेकांचे बळी गेले होते. या वेळी विरोधकांपेक्षा भाजपने शिवसेनेवर कठोर टीका केली होती. आता लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टीकेच्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पूल अपघातावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले असताना भाजपने "ब्र'ही काढलेला नाही. 

मुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-भाजपला घेरणार असल्याने मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होणार आहे. 

राज्यात युतीची सत्ता असताना मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचा झेंडा फडकत आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत असली तरी गेल्या साडेचार वर्षांत भाजपवर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे यांनी सोडली नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे बाण सोडले होते. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी शिवसेनेची कोंडी केली होती. महापालिकेचा निकाल लागला असता सत्ता स्थापन करताना भाजप पहारेकऱ्याच्या भूमिकेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही महापालिका कारभारावरून भाजपने अनेकदा शिवसेनेवर जहरी टीका केली होती. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून काही दिवसांतच प्रचाराच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीरनामा तयार करण्याची कार्यवाही सुरू असून यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे याच मुद्यावर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत युतीला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली असून मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होण्याची शक्‍यता आहे. 

सत्तेसाठी युतीच्या तलवारी म्यान 
गेल्या दीड-दोन वर्षांत मुंबईत असंख्य ठिकाणी लागलेल्या आगीत सर्वसामान्यांना प्राण गमवावे लागले होते. तसेच अंधेरी आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांच्या दुर्घटनेतही अनेकांचे बळी गेले होते. या वेळी विरोधकांपेक्षा भाजपने शिवसेनेवर कठोर टीका केली होती. आता लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टीकेच्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पूल अपघातावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले असताना भाजपने "ब्र'ही काढलेला नाही. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात येईल. मुंबईतील दुर्घटनांबाबतच युतीच्या नेत्यांना उत्तर देण्यास भाग पाडू आणि मुंबईकरांसमोर त्यांचा बुरखा फाडू. 
- सचिन सावंत, प्रवक्‍ते, काँग्रेस. 

Web Title: Shivsena BJP alliance difficult to win seats in Mumbai