शिवसेनेच्या कामांचे श्रेय लाटण्याची भाजपला सवय ; खासदार गजानन कीर्तीकर यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

प्लास्टिक हे अतिशय घातक आहे, त्यामुळे त्यावरील बंदीचा निर्णय योग्यच आहे; मात्र त्याची अंमलबजावणी कशी करावी हा प्रश्‍न आहे. त्याच्या उत्पादनावरच बंदी घालता येईल का हे पाहायला हवे, असेही कीर्तिकर म्हणाले. 

मुंबई : राममंदिर स्थानकाचे उद्‌घाटन असो, वर्सोवा खाडीतील गाळ काढण्याचे काम असो किंवा गोरेगावपर्यंत हार्बर मार्ग वाढवण्यासाठीचा पाठपुरावा असो, आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली आहे, अशी टीका शिवसेनेचे वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शनिवारी (ता. 31) पत्रकारांशी बोलताना केली. 

गोरेगाव येथील भाजप आमदार व महिला बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर तसेच वर्सोवा येथील भाजप आमदार भारती लव्हेकर यांनाही कीर्तिकर यांनी याबाबत लक्ष्य केले. या सर्व कामांसाठी मी स्वतः अनेक महिने पाठपुरावा केला आणि काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले की भाजपचे लोकप्रतिनिधी पत्रक काढून त्याचे श्रेय लाटतात. साडेतीन वर्षे आम्ही हे दुखणे सहन करीत आहोत, अशी खंतही कीर्तिकर यांनी व्यक्त केली. अगदी ट्रम्प जरी काहीही बोलले, तरी पंतप्रधानांची त्यांच्याशी मैत्री आहे, असे सांगून भाजप त्याचे श्रेय घेते, असा टोलाही त्यांनी लगावला. 

कीर्तिकर म्हणाले, की राममंदिर स्थानकासाठी मी राजनाथ सिंह, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री फडणवीस आदींकडे पाठपुरावा केला; मात्र शेवटच्या क्षणी राज्यमंत्री ठाकूर आणि त्यांचे नगरसेवक पुत्र दीपक यांनी तेथे बॅनरबाजी करून श्रेय लाटले. गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे सुरू व्हावी यासाठी मी तीन वर्षे पाठपुरावा करीत होतो. रेल्वेमार्गाशेजारील रहिवाशांसोबत मी आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी बैठक घेतली, नंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली; मात्र शेवटच्या क्षणी भाजप नेत्यांनी श्रेय लाटले. म्हणूनच शिवसेनेने समारंभावर बहिष्कार टाकला, असेही कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. वर्सोवा खाडीत साठणारा गाळ काढण्यासाठी मी ड्रेजिंग कॉर्पोरेशन, मेरिटाईम बोर्ड यांच्या अधिकाऱ्यांना तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही भेटलो; मात्र आमदार लव्हेकर यांनी त्यांच्या एका पत्रामुळे काम झाल्याचे फलक लावले. खरे पाहता एका पत्रामुळे अशी कामे होत नसतात. खरे काय नागरिकांना कळायला हवे, असेही कीर्तिकर म्हणाले. 

भाजपचा हा प्रकार म्हणजे शिवसेनेच्या खच्चीकरणाचा प्रयत्न आहे. देशातील सध्याच्या राजकीय वातावरणामुळे भाजपचे नेते बेजार झाले आहेत. मोदींचे सरकार पुन्हा येईल की नाही, या भीतीने ते अस्वस्थ झाले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर युती करावी की नाही, याबाबत भाजपचे मुनगंटीवार एक सांगतात; तर गिरीष महाजन दुसरेच सांगतात; मात्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच "एकला चलो रे'चा आदेश दिला आहे, असेही कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. 

प्लास्टिकबंदीचे समर्थन 

प्लास्टिक हे अतिशय घातक आहे, त्यामुळे त्यावरील बंदीचा निर्णय योग्यच आहे; मात्र त्याची अंमलबजावणी कशी करावी हा प्रश्‍न आहे. त्याच्या उत्पादनावरच बंदी घालता येईल का हे पाहायला हवे, असेही कीर्तिकर म्हणाले. 

कीर्तीकर म्हणाले... 

- राममंदिर बांधणी न्यायालयाच्या निकालावर अवलंबून 
- निकालानंतर देशात वादंग होईल 
- जातीय दंगलींचीही शक्‍यता 
- आज भाजपला मित्रपक्षांची गरज आहे 
- एनडीए तुटत असल्याने भाजपचे हाल 
- युती न झाल्यास दोघांचेही नुकसान 
- पुन्हा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा 

Web Title: Shivsena Gajanan Kirtikar Criticizes BJP