esakal | विरोधकांना पळताभुई थोडी होईल; भिडेंच्या विधानावरून राऊतांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची हे कोणतं राजकारण चाललंय असा सवालही त्यांनी विचारला. 

विरोधकांना पळताभुई थोडी होईल; भिडेंच्या विधानावरून राऊतांचा इशारा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात लशींचा तुटवडा आहे. लसीचं राजकारण होत असल्याची टीका राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून केली जात आहे. तर केंद्राकडून महाराष्ट्राने कोरोनाची परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा आरोप केला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रात मंत्री असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना फटकारलं आहे. राऊत म्हणाले की,पूर्वी महाराष्ट्राच्या हक्कासाठी विरोधक सुद्धा एकत्र येऊन केंद्राशी लढायचे. आता चित्र उलटं आहे. जगाच्या इतिहासात मी असं पाहिलं नाही. आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची हे कोणतं राजकारण चाललंय असा सवालही त्यांनी विचारला. 

पंतप्रधान मोदींनी लस उत्सव साजरा करा असं आवाहन देशातील नागरिकांना केलं आहे. त्यावरूनही राऊतांनी टोला लगवाला आहे. पंतप्रधान एकीकडे लस उत्सव साजरा करा म्हणतात आणि महाराष्ट्रात मात्र लशीचा तुटवडा आहे. का तर, इथं भाजपचं राज्य नाही आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यानं असं वागतायत असेही राऊत म्हणाले.  इतर राज्यांना गरजेपेक्षा जास्त लस दिली. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जास्त लस दिल्या. गुजरातमध्ये परिस्थिती भीषण आहेत. तिथं लोकसंख्या कमी असताना एक कोटी लस देत आहेत असंही राऊत यांनी सांगितलं. गुजरातबाबत न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. गुजरातमध्ये महाराष्ट्र मॉड़ेल राबवा असं न्यायालयानं सांगितलं आहे. आता महाराष्ट्राताल एक कोटी 60 लाखांहून अधिक लस लागते तर तुम्ही फक्त दहा लाख देऊन तोंडाला पाने पुसताय असंही संजय राऊत म्हणाले. 

मुंबईतील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी गुरुवारी कोरोनाबाबत बोलताना वादग्रस्त असं वक्तव्य केलं होतं. कोरोना हा आजारच नाहीत. तो मानसिक रोग आहे. कोरोनामुळे मरणारे जगण्याच्या लायक नाहीत असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, भाजपचे विचारक काल काहीतरी बोलले. XX असतात त्यांना कोरोना होतो. तर तुम्ही या राज्याच्या जनतेला XX समजता का? आम्ही तुम्हाला दाखवू XX आहे की कोण? आतासुद्धा शिवसेना महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर पळताभुई थोडी होईल पण वातावरण बिघडवायचं नाही असंही राऊत यांनी म्हटलं. 

लसीवरून सुरु असलेल्या राजकारणावरूनही विरोधकांवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की, आम्हाला राजकारण आणायचं नाही. तुम्ही आणू नका, तुम्ही राजकारणातले आमचे सहकारी आहात. राज्याने 105 आमदार निवडून दिले आहेत. जनतेनं केलेल्या मतदानाची महाराष्ट्राने भाजपनं जाण ठेवावी. महाराष्ट्रातील या लोकांसाठी तरी लस घेऊन या. या राज्यातील जनता जेवढी तुमची आहे तेवढी आमचीही आहे. लस म्हणजे काय वाईन शॉप आहे का? त्यावरून मारामारी केली जातेय. त्यांच्या डीएनएमध्ये काय आहे ते पहावं लागेल. सामान्य माणसाला जगवतं ते राजकारण असंही राऊत म्हणाले. 

हे वाचा - राज ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंना फोन, महत्त्वाच्या विषयावर चर्चा

मुंबईत 21 केंद्र बंद पडली आहेत. अनेक ठिकाणी 2 दिवस पुरेल इतका लशीचा साठा आहे. लोकं रांगेत तडफडत आहेत. आधी नोटबंदीच्या रांगेत आणि लशीसाठी रांगेत आहेत. केंद्र सरकारचं नियोजनं चुकलं आहे. राज्याला दोष देऊ नका असंही राऊत यांनी म्हटलं. विरोधकांकडून राजकारण केलं जातंय. विरोधकांनी अंगावर येऊ नये, थोडं संयमाने वागावं असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. 

loading image