पादचारी पुलावरून श्रेयवाद शिवसेना, राष्ट्रवादीकडून उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

ईश्‍वर नगर- इंदिरा नगर, सर्वेश्‍वर सोसायटीजवळ रेल्वे रुळांवर पादचारी पूल नसल्यामुळे नागरिकांना रूळ ओलांडावे लागत होते.

ठाणे : कळवा-खारीगाव पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा पादचारी पूल नसल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना अनेकदा अपघात होत होते. सन 2015 मध्ये दोन बहिणींचे अपघाती निधन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी येथे पूल उभारण्यासाठी संघर्ष केला होता.

पूल बांधून झाल्यानंतर अपघातात दगावलेल्या मुलींच्या आईनेच शनिवारी पुलाचे आव्हाड यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन केले. त्याचप्रमाणे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा पादचारी पूल पूर्णत्वास आल्याचा दावा करून शिवसेनेकडून शनिवारीच सायंकाळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या पुलाच्या उद्‌घाटनातही श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. 

ईश्‍वर नगर- इंदिरा नगर, सर्वेश्‍वर सोसायटीजवळ रेल्वे रुळांवर पादचारी पूल नसल्यामुळे नागरिकांना रूळ ओलांडावे लागत होते. या ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडताना श्‍वेता आणि कांचन आनंद दाखीणकर या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी पूल उभारावा या मागणीसाठी रेल रोको केला होता. त्या वेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पूल उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर पाठपुरावा करून आव्हाड यांनी या पुलाची मंजुरी मिळवली होती. 

शिवसेनेचा दावा... 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने कळव्यातील इंदिरानगर येथील सर्वेश्‍वर सोसायटीजवळ रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. इंदिरानगर येथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून जीव धोक्‍यात घालून लोकांना रेल्वे रूळ ओलांडावा लागत असे. त्यामुळे खासदार शिंदे यांनी सर्वेश्‍वर सोसायटीजवळ पादचारी पूल बांधण्याची मागणी रेल्वेकडे केली होती. त्यानुसार मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून (एमआरव्हीसी) या पुलाचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. 

 

Web Title: Shivsena NCP inaugurated on the pedestrian bridge