महापौरपदासाठी शिवसेनेचे डावपेच

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मनसेच्या साथीची अटकळ; भाजपला हाक देण्याची शक्‍यता कमीच
मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत युती तोडण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौरपदही स्वबळावरच मिळविण्यासाठी शिवसेना डावपेच आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला युतीसाठी हाक द्यायची नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी शक्‍यता आहे.

मनसेच्या साथीची अटकळ; भाजपला हाक देण्याची शक्‍यता कमीच
मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत युती तोडण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौरपदही स्वबळावरच मिळविण्यासाठी शिवसेना डावपेच आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला युतीसाठी हाक द्यायची नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी शक्‍यता आहे.

महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे संख्याबळ आहे. शिवसेनेचे 84 व पाच अपक्ष असे 89 नगरसेवकांचे बळ शिवसेनेकडे आहे, तर मुंबई व मराठी या अस्मितेच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेसोबत येईल अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे मनसेचे सात नगरसेवक मिळाल्यास शिवसेनेचे संख्याबळ 95पर्यंत जाते.

महापौरपदाच्या निवडीसाठी बहुमताच्या 114 मतांची कोणतीही आवश्‍यकता नसते. त्यामुळे महापौर व उपमहापौरपदाचा उमेदवार थेट उभा करून उपलब्ध संख्याबळावर सत्ता स्थापन करण्याचे डावपेच शिवसेना आखत असल्याचे समजते.

भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेनेला कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. पण, महापालिकेमध्ये भाजपच्या मदतीशिवाय महापौरपद मिळविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. भाजपसोबत युती केल्यास उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर महत्त्वाच्या समित्यांमधे भाजपला स्थान द्यावे लागेल. त्यामुळे भाजपशिवाय महापालिका ताब्यात ठेवण्याची रणनीती आखण्यात शिवसेना नेते व्यग्र आहेत.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महापौरपदाच्या निवडणुकीत थेट सहभागी होण्याची शक्‍यता कमी आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मिळून 40 नगरसेवक जर तटस्थ राहिले, तर शिवसेनेचे गणित आणखी सोपे होणार आहे. या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याशिवाय शिवसेना महापौर व उपमहापौरपद मिळवू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

भाजपची अडचण
भाजपला मात्र स्वत:चे 82 व इतर तीन अपक्षांची मदत मिळाली तरी त्यांचे संख्याबळ 85 होते. समाजवादी पक्षाचे सहा व "एमआयएम'चे तीन नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे सभागृहात महापौर निवडीच्या वेळी भाजपकडे जास्तीत जास्त 85च्या पुढे संख्याबळ घेऊन जाणे अवघड असल्याचे मानले जाते. दरम्यान, महापालिकेत शिवसेना हा मोठा पक्ष असल्याने युती करून महापौरपद शिवसेनेला द्यावे व उपमहापौरपद घ्यावे असा सोयीचा मार्गदेखील भाजपकडून स्वीकारला जाईल, असा दावा करण्यात येत आहे.

Web Title: shivsena planning for mumbai mayor