esakal | सामनातून भाजपवर टीकास्त्र, पायलट यांना शिवसेनेनं दिला 'हा' सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

सामनातून भाजपवर टीकास्त्र, पायलट यांना शिवसेनेनं दिला 'हा' सल्ला

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजस्थानमध्ये सत्तानाट्य रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

सामनातून भाजपवर टीकास्त्र, पायलट यांना शिवसेनेनं दिला 'हा' सल्ला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजस्थानमध्ये सत्तानाट्य रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षानं काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामनाचा अग्रलेखातून हे टीकास्त्र सोडलं आहे. 

विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करत आहे. काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजाराला उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरु आहे. भाजपकडे संपूर्ण देशाची सत्ता, काही घरे त्यांनी विरोधकांना सोडायला हवीत, असं अग्रलेखात म्हटलं आहे. तसंच पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वत:ला कलंकित करुन घेऊ नये, असा सल्लाही राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना दिलाय.

अधिक वाचाः जगात कोरोनाचा कहर! पाच दिवसातील रुग्णांची संख्या तब्बल 10 लाखावर...

जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही. यासाठी भारतीय जनता पक्ष उघडपणे काहीच करीत नसून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून चालले आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे. 

शिवसेनेनं अग्रलेखात काय लिहिलं? 

  • मध्य प्रदेशचा घास गिळला तेव्हाच सगळ्यांना खात्री होती की, पुढचा नंबर राजस्थानचा आहे. तेथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याच मार्गाने जातील असे पैजा लावून सांगितले गेले. ते खरे ठरताना दिसत आहे.
  • २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँगेसचे १०७ आणि भाजपचे ७२ आमदार आहेत. अपक्ष व इतर आमदारही सरकारबरोबर होते. त्यातले काही परंपरेप्रमाणे कुंपणावर जाऊन बसले आहेत. पायलट यांचा दावा असा की, काँगेसचे सरकार आता अल्पमतात आले आहे. पायलट यांचे म्हणणे खरे असले तरी सरकारचे भविष्य हे विधानसभेत ठरेल. काँगेस आमदारांची जी बैठक विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलावली, त्यास पायलट यांना मानणाऱ्या दहा-बारा आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे खरा आकडा हा विधानसभेत डोकी मोजल्यावरच कळेल.
  • ज्योतिरादित्य शिंदे यांना फूस लावून फोडले तेव्हाही भाजपच्या दृष्टीने हा काँगेसअंतर्गत प्रश्नच होता व आता पायलट यांची खेळी हादेखील अंतर्गत प्रश्नच आहे. महाराष्ट्रात अजित पवारांना घेऊन भाजपने सकाळीच शपथविधी उरकला. तेव्हाही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय होता. त्यामुळे अशा अंतर्गत बाबी सोयीप्रमाणे ठरत असतात. मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपवर जो घोडेबाजाराचा आरोप केला तो गंभीर आहे. एका एका आमदाराला पंचवीस कोटींची ऑफर दिली जात आहे व तसे व्यवहार सुरू आहेत, पण आता आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत त्या गेहलोत यांना पाठिंबा देणाऱया आमदारांवर. हे गूढ व रहस्यमय आहे.
  • पायलट यांनी काँगेस सोडावी यासाठी मध्य प्रदेशमधून फुटलेले ज्योतिरादित्य शिंदे हे परिश्रम घेत आहेत. बाटगा जरा जास्तच जोरात बांग देतो, त्यातलाच हा प्रकार व यापासून कोणताही पक्ष दूर नाही. राजकारणात बाटग्यांना महत्त्व मिळते हा प्रकार नवा नाही. लडाख सीमेवरील आपल्या २० सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, काँगेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरू आहे. वाळवंटात राजकीय उपद्व्याप करून वादळ निर्माण करून भाजप काय साध्य करणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल. भाजपकडे देशाची संपूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत. यातच लोकशाहीची शान आहे.

Shivsena Saamana editorial criticizes bjp rajasthan political