लोकसभेसाठी शिवसेनेची स्वबळाची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावरच लढण्याचा निर्धार शिवसेनेने कायम ठेवला असून, आज मुंबईतल्या सहाच्या सहा जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील आमदार व खासदारांची बैठक घेतली. यामध्ये आगामी निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याने तयारीला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. दरम्यान, राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गणेशोत्सवाच्या अगोदर निश्‍चित करणार असल्याचेही सूतोवाच ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपच्या कार्यपद्धतीवर सतत टीका करत स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने आज तयारीचा आढावा घेतला. मुंबईत यासाठीच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात दीपक सावंत व विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या नावाबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मनसेतून नुकतेच शिवसेनेत परतलेले माजी आमदार शिशीर शिंदे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. तर, गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात माजी महापौर शुभा राऊळ व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याचे संकेत आहेत. 

विद्यमान खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे व गजानन कीर्तीकर यांची उमेदवारी कायम राहणार आहे. ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हास्तरीय नेते, संपर्कप्रमुखांच्या बैठका घेण्यास सुरवात केली असून, 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्‍चित करण्याचा अंतिम टप्पा सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम 
राज्यात शिवसेनेचे 18 खासदार आहेत. या सर्व विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम ठेवण्यात येणार असून, त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर, उर्वरित 30 लोकसभा मतदारसंघापैकी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, रत्नागिरी येथील भाजपच्या विरोधातील उमेदवरांची यादी तयार असल्याचा दावा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या अगोदरच राज्यातील सर्व 48 उमेदवारांची यादी अंतिम होईल, असा विश्‍वास ठाकरे यांनी या बैठकीत शिवसेना नेत्यांना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

Web Title: Shivsena self-preparation for the Lok Sabha election