अस्मितेच्या बळावर शिवसेनेने गड राखला 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न ओसरलेली जादू भाजपसाठी उपयुक्त ठरली असली तरी प्रादेशिक अस्मितेच्या निखाऱ्याला दिलेली हवा आणि स्थानिक उमेदवारांना दिलेले प्राधान्य, या जोरावर शिवसेनेने ठाण्याचा गड राखला आहे. परिवर्तनाच्या वादळातही स्थानिक उमेदवारांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावरच त्यांची नौका तरली आणि ठाण्यात शिवसेनेला एकहाती सत्ता मिळू शकली. 

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न ओसरलेली जादू भाजपसाठी उपयुक्त ठरली असली तरी प्रादेशिक अस्मितेच्या निखाऱ्याला दिलेली हवा आणि स्थानिक उमेदवारांना दिलेले प्राधान्य, या जोरावर शिवसेनेने ठाण्याचा गड राखला आहे. परिवर्तनाच्या वादळातही स्थानिक उमेदवारांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावरच त्यांची नौका तरली आणि ठाण्यात शिवसेनेला एकहाती सत्ता मिळू शकली. 
"सकाळ माध्यम समूहा'ने केलेल्या सर्वेक्षणात परिवर्तनाचा मुद्दा प्रभावी ठरल्याचे दिसले. ठाण्यातील तब्बल पासष्ट टक्के मतदारांनी मतदान परिवर्तनासाठीच केल्याचे सांगितले. पण त्यातही शिवसेनेला झुकते माप देत पंचावन्न टक्के मतदारांनी शिवसेनेला कौल दिला, तर भाजपला छत्तीस टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. भाजपला मतं देणाऱ्या छत्तीस टक्के मतदारांसाठी मोदी महत्त्वाचे ठरले, तर पंचवीस टक्के मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीला कौल दिला. भाजपविरोधकांचा टप्पाही जाणवण्याजोगा होता. कारण, 41 टक्के मतदारांनी भाजपला हरविण्यासाठी मतदान केले होते. शिवसेनेला हरविण्यासाठी मतदान केलेल्या मतदारांची टक्केवारी 29 होती. 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीबरोबरच, स्थानिक उमेदवार हेच शिवसेनेचे निवडणुकीतील प्रमुख अस्त्र ठरले. शिवसेनेला मतदान करणाऱ्या 37 टक्के मतदारांनी स्थानिक उमेदवार असल्याने शिवसेनेला मतदान केल्याचे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांच्यासाठी 31 टक्के मतदारांनी मतदान केले. छपन्न टक्के मतदारांनी आपला कौल प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने दिला आहे. 

पारदर्शकता गायब 
पारदर्शकतेचा मुद्दा ठाण्यात दिसला नाही. 68 टक्के मतदारांनी या मुद्द्याची दखलही घेतली नाही, तर 58 टक्के मतदारांनीही नोटाबंदीचा विषय दखलपात्र नसल्याचे नमूद केले आहे. 

पवारांना कौल 
ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने चौतीस जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करणाऱ्या मतदारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मतदान केले आहे. तब्बल चाळीस टक्के मतदारांनी शरद पवार यांच्यासाठी मतदान केले. मात्र, कॉंग्रेसला मतदान करणाऱ्या 32 टक्के मतदारांनी स्थानिक नेतृत्वाकडे बघून मतदान केले, तर 45 टक्के मतदारांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून मतदान केले. 

मनसेलाही पसंती 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 18 टक्के मतदारांनी अपक्ष उमेदवारांना पसंती दिली, तर 43 टक्के मतदारांनी मनसेला. 
एमआयएमला 5 टक्के मतदारांनी प्राधान्य दिले. 

मशिनचा घोटाळा नाही 
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर राज्यभरात इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत शंका घेतली जात आहे. विरोधात आवाज उठू लागले. ठाण्यातही या मशिनविरोधात राजकीय आंदोलन झाले आहे. मात्र, मतदारांनी ही शक्‍यता फेटाळून लावली आहे. 71 टक्के मतदारांनी मशिनमध्ये घोटाळा नसल्याचा कौल दिला आहे. 
 

Web Title: shivsena success in TMC election2017 analysis