शिवसेनेच्या मतांसाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जाहीर युती टाळत शिवसेनेने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्वबळाचा डाव टाकला असताना, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी "फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जाहीर युती टाळत शिवसेनेने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्वबळाचा डाव टाकला असताना, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी "फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे.

कोकणात भाजपने, तर उस्मानाबाद-लातूर-बीडमध्ये शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. यामुळे दोन्ही पक्षांतल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात बीड-उस्मानाबाद-लातूर मतदारसंघाची निवडणूक स्वत: मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना विजयी करण्यासाठी येथे शिवसेनेच्या मतांची गरज आहे. या मतदारसंघात शिवसेनेची जवळपास 65 मते आहेत. मात्र, अद्याप शिवसेनेला मतदानात कोणती भूमिका घ्यायची, याबाबत आदेश नाहीत.

दरम्यान, शिवसेनेची ही मते भाजप उमेदवाराला मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तर, शिवसेनेने कोकणातील भाजपच्या 142 मतांसाठी मराठवाड्यातील बीड मतदारसंघात दबावतंत्र सुरू केल्याची चर्चा आहे. बीड-लातूर-उस्मानाबादमध्ये शिवसेनेचा उमेदवार नसल्याने भाजपला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना केल्याचे सांगण्यात आले. या मतदारसंघात शिवसेना भाजप उमेदवाराला दगाफटका करणार नाही, याची पूर्णत: काळजी मुख्यमंत्री घेत असल्याचा दावाही करण्यात आला.

तिसऱ्याला लाभ नको
भाजप-शिवसेनेतील या राजकीय कुरघोडीच्या नादात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फायदा होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतल्याचे सांगण्यात येते.

Web Title: shivsena vote chief minister filding politics