'शिवशाही'ला अपघातांचे ग्रहण; ठाण्यात वर्षभरात 27 अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

ठाणे : अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एसटीच्या वातानुकूलिन आणि आरामदायी शिवशाही बसेसना अपघातांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. या शिवशाही बसचे वर्षभरात तब्बल 27 अपघात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या शिवशाही बसचे सात, तर एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बसचे तब्बल 20 अपघात झाल्याची माहिती आहे. शिवशाहीच्या या अपघातांचा धडा घेत एसटी प्रशासनाने आता पुण्यातील भोसरी प्रशिक्षण केंद्रातील ऑटोमॅटिक ट्रॅकवर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या बसचालकांच्या हाती स्टेअरिंग देण्यास सुरुवात केली आहे. 

अवैध खासगी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बसेस रस्त्यावर उतरवल्या. तिकिटांचे माफक दर आणि वायफायसह मोबाईल चार्जिंग, अत्याधुनिक सुविधा पुरवल्याने प्रवाशांनीही शिवशाहीला अल्पावधीत पसंती दिली. शिवशाही बसेस लांबपल्ल्यांच्या मार्गावरही धावत आहेत. ठाणे विभागात ठाणे-बोरिवली, ठाणे-भाईंदरसह, ठाणे-पुणे तसेच इतर मार्गावरही या बसेस धावतात. ठाण्यात एकूण 47 शिवशाही बसेस असून यातील 35 एसटीच्या, तर उर्वरित 12 कंत्राटी शिवशाही बसेस आहेत.

कंत्राटी शिवशाही बसवर वाहक एसटीचा असला तरी चालक मात्र, कंत्राटदाराचे आहेत. मागील काही दिवसांत राज्यभरात झालेल्या शिवशाही बसेसच्या अपघातानंतर खासगी शिवशाहीवरील चालक योग्य प्रशिक्षित नसल्याची बाब समोर आली. वर्षभरात ठाण्यात शिवशाहीचे 27 अपघात घडले असून यातील एक प्राणांतिक; तर 16 अपघात गंभीर स्वरूपाचे आहेत. नऊ अपघात किरकोळ स्वरूपाचे असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. 

एसटीचे चालक प्रशिक्षित असतात, मात्र खासगी शिवशाहीवरील चालकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते. तेव्हा, मागील पाच ते सहा महिन्यांपासून शिवशाही बसवरील खासगी चालकांची भोसरी येथील प्रशिक्षण केंद्रात ऑटोमेटिक ट्रेकवर चाचणी घेतली जाते. या चाचणीत उत्तीर्ण ठरणे चालकांना बंधनकारक आहे. येथील ट्रेकवरील सेन्सरमुळे प्रशिक्षण घेताना चालकांची कसोटी लागते. 

- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी विभाग 

Web Title: Shivshahi Buses Accidents 27 accidents in Thane during the year