शिवशाहीची दौड आता गुजरातमध्येही

दीपक शेलार 
मंगळवार, 1 जानेवारी 2019

ठाणे : वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासामुळे अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एसटीच्या शिवशाही बसेसची दौड आता गुजरातमध्येही सुरू होणार आहे. नववर्षात बोरिवली ते अहमदाबाद या मार्गावर शिवशाही धावणार असून लवकरच काही दिवसांत मुलुंड ते वडोदरा येथेही बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत देण्यात आली. बोरिवली-अहमदाबाद बस मार्गाला गुजरात राज्य परिवहनने मान्यता दिली असून मुलुंड-वडोदरा मार्गावरील प्रस्तावाबाबत मंजुरीची प्रतीक्षा सुरू असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले. 

एसटीच्या ठाणे विभागात ठाणे-बोरिवली, ठाणे-भाईदर, ठाणे-हैदराबाद, कल्याण-नगर, ठाणे-पुणे, कोल्हापूर, शेगाव; तसेच इतर काही महत्त्वाच्या मार्गांवर शिवशाही बसेस धावतात. ठाण्यात एकूण 47 शिवशाही बसेस असून यातील 35 एसटीच्या; तर उर्वरित 12 कंत्राटी शिवशाही बसेस आहेत. शिवशाहीचे हे सर्व मार्ग नफ्याचे असून एसटी विभागाने आता गुजरात राज्यात शिरकाव करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शिवशाही बसेस अहमदाबाद आणि वडोदरा येथे धाडण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाने मंजूर केला असून यातील बोरिवली-अहमदाबाद या बस सेवेला गुजरात राज्य परिवहन महामंडळाने मान्यता दिली असल्याने नववर्षात अहमदाबादेत शिवशाही बसेसचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. तर दुसरी मुलुंड-वडोदरा या मार्गावर दोन शिवशाही पाठवण्याचा प्रस्ताव एसटी विभागाने मंजूर केला असून लवकरच गुजरात राज्य परिवहनकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. 

खासगी बसेसची मक्तेदारी मोडीत निघणार 

मुंबई-ठाण्यात गुजराती-मारवाडी समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गुजरातमध्ये जाण्यासाठी खासगी बसेसवर अवलंबून राहावे लागायचे. आता शिवशाही बसेस सुरू होणार असल्याने खासगी बसेसची मक्तेदारी मोडीत निघेल. 

ठाणे विभागाकडून यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या शिवशाही वातानुकूलित बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. तेव्हा, त्या-त्या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार बस सेवा पुरवली जाते. त्यानुसार, गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि वडोदरा शिवशाही बसेस सोडण्यात येणार आहेत. या गाड्या रात्री धावणार असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेसची संख्या वाढवण्याचा मानस आहे. 

- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी विभाग 
 
Web Title: Shivshahi Run is now in Gujarat