महाडमध्ये २५ एकर जागेवर भव्य शिवसृष्टी उभारणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

महाड शहरात नगर परिषदेतर्फे २५ एकर जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार माणिक जगताप यांनी बुधवारी येथे केली.

महाड (बातमीदार) : महाड शहरात नगर परिषदेतर्फे २५ एकर जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार माणिक जगताप यांनी बुधवारी येथे केली. महाड नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ माणिक जगताप, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

माणिक जगताप यांनी शिवसृष्टी म्हणजे शहराचे मुख्य आकर्षण असेल, यामुळे या ऐतिहासिक शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडेलच; शिवाय पर्यटन वाढून असंख्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास जगताप यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. आमदार अनिकेत तटकरे यांनी महाड नगरपालिकेच्या कामाचे कौतुक करताना राज्यात सत्ता नसतानाही माणिक जगताप नगर परिषदेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणतात, त्यांचे हे कसब सत्ताधारी पक्षालाही जमत नाही. विकासकामांच्या बाबतीत महाड नगर परिषद रोहा नगर परिषदेपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचेही सांगितले. 

शहरातील नवेनगर येथील समाज मंदिर लोकार्पण, मिलिटरी बॉईज हॉस्टेल येथील रस्त्याचे बांधकाम, हुतात्मा अर्जुन भोई मार्ग नवीन जलवाहिनी, प्रभात कॉलनी आणि जवाहर कॉलनी, नवीन जलवाहिनी, जवाहर हाऊसिंग सोसायटी सभा मंडप, गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे डांबरीकरण आणि उद्‌घाटन, नाते खिंड रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे बांधकाम, गांधारी नाका रोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम, तसेच गटारांच्या कामांची भूमिपूजन करण्यात आली आहेत.

या वेळी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, उपनगराध्यक्ष वजिर कोंडिवकर, नगरसेवक प्रमोद महाडिक, सुनील कविस्कर, संदीप जाधव, सुषमा यादव, विद्या साळी, सपना बुटाला, रश्‍मी बाईत, मयुरी शेडगे, मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोर्पे, सुदेश कलमकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivshruti in Mahad