'या' ऐतिहासिक किल्ल्यावर अवतरणार शिवसृष्टी; पुरातत्त्व विभागाची परवानगी

संदिप पंडित
Saturday, 29 August 2020

मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम करण्याबरोबरच किल्ल्याच्या शेजारील मोकळ्या 9 एकर जागेत भव्य "शिवसृष्टी' उभारण्याच्या कामाला राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून आवश्‍यक परवानगी मिळाली आहे.

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम करण्याबरोबरच किल्ल्याच्या शेजारील मोकळ्या 9 एकर जागेत भव्य "शिवसृष्टी' उभारण्याच्या कामाला राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून आवश्‍यक परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता शिवसृष्टीचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ही बातमी वाचली का? शेजारी मायानगरी मुंबईचा झगमगाट; मात्र लगतचा जिल्हा अंधारातच..!

घोडबंदर किल्ल्याचे संवर्धन व्हावे व घोडबंदर किल्ला परिसराचे सुशोभीकरण मार्गी लागावे म्हणून आमदार सरनाईक यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. आमदार सरनाईक यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत चर्चा करून पर्यटन स्थळ म्हणून घोडबंदर किल्ल्याचा पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करून घेतला होता. या किल्ल्याशेजारी असलेल्या 9 एकर जागेत "शिवसृष्टी' उभारण्याच्या कामी प्रकल्प अहवाल तयार करून ही शिवसृष्टी उभारण्यासाठी महापालिकेने पुरातत्त्व विभागाकडे परवानगी मागितली होती. किल्ल्याच्या जवळ असलेल्या शासकीय 9 एकर जागेत किल्ल्याच्या तटबंदीपासून 35 मीटर अंतर सोडून हा शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. किल्ल्याच्या मूळ बांधकामाला कोणतीही इजा पोहोचणार नाही, अथवा येथील घटक नष्ट होणार नाहीत याची दक्षता घेऊन काही अटींच्या अधीन राहून शिवसृष्टी प्रकल्पासाठी ना-हरकत देण्यात आली आहे. शिवसृष्टी उभारण्यासाठी सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, रत्नागिरी यांच्या स्तरावरून परवानगी देण्यात आली असून तशी माहिती पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या संचालकांनी आमदार प्रताप सरनाईक यांना लेखी कळवले आहे. 

ही बातमी वाचली का? दुकाने उघडू लागली तरी मुख्य 'आधार' दुरावला, अनलॉकमध्येही विक्रेते हतबल  

आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास विद्यार्थी, इतिहास प्रेमी व नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. यासाठी घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम करीत असताना त्यामध्ये हा भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याचे माझे स्वप्न आहे. या शिवसृष्टी प्रकल्पात महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. इतिहासाची माहिती देतानाच या ठिकाणी म्युजिकल फाउंटन, लॅंडस्केपिंग गार्डनसह, लाईट व साउंड शो अशी विविध कामे केली जाणार आहेत. भविष्यात याठिकाणी जेट्टी बांधल्यानंतर या ठिकाणी वॉटर स्पोर्टस सुरू होऊ शकतात. तसेच येथे रो-रो सेवा, वसई-ठाणे-भाईंदर मार्गावर जल वाहतुकीलासुद्धा प्राधान्य मिळू शकणार आहे. 
- प्रताप सरनाईक, आमदार. 

--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsrishti to descend on historic Ghodbunder fort; Permission from the Department of Archeology