शोएब अख्तरचे भारत-पाकिस्तानबद्दल मोठे विधान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

शोएब अख्तरचे भारतावर टिकास्त्र

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू गोलंदाज शोएब अख्तर म्हणजेच रावळपिंडी एक्सप्रेस याने भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने खेळवण्याबाबत भारतावर टिकास्त्र सोडलं आहे. "आम्ही कांदे खातो आणि टोमॅटोही तसंच आम्ही आनंदांची देवाणघेवाण करतो मग फक्त क्रिकेट खेळण्यासाठीच बंदी का?" असा सवाल शोएब अख्तर याने विचारला आहे.

हेही वाचा - फाफ डुप्लेसीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा सुरू व्हावेत यासाठी शोएब अख्तर आग्रही आहे. जानेवारी २०१३ पासून भारत-पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. त्यात भर म्हणून मागच्या काही वर्षांपासून पाकिस्तानकडून सुरूअसलेल्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच खराब झाले आहेत. 

काय म्हणाला शोएब अख्तर:

" जर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कबड्डीचे सामने होऊ शकतात, डेव्हिस कप खेळला जाऊ शकतो तर क्रिकेटचे सामनेच का खेळवण्यात येत नाहीत?, भारत,पाकिस्तान हे दोन्ही देश कांदे आणि टोमॅटो खातात,आनंदाची देवाणघेवाणही करतात मात्र क्रिकेटचे सामने खेळवले जात नाहीत. पाकिस्तान हा देश आदरातिथ्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो,विरेन्द्र सेहवाग,सचिन तेंडुलकर,सौरव गांगुली यांसारख्या खेळाडूंना पाकिस्तानात आल्यावर नेहमीच प्रेम आणि आदर मिळाला आहे हवं तर त्यांना जाऊन विचारा" असं शोएब अख्तर याने म्हंटल आहे.

"पाकिस्तान हा प्रवासासाठी सुरक्षित देश आहे. बांग्लादेशचा संघ पाकिस्तानात येऊ शकतो, भारताचा कबड्डी संघही येऊ शकतो तर भारताचा क्रिकेट संघही येऊ शकतो. मात्र अजूनही शंका असेल तर एखादी सुरक्षित जागा ठरवावी आणि तिथे द्विपक्षीय सामने खेळवण्यात यावे ", असंही शोएब अख्तर याने म्हंटल आहे.

यापुढे जाऊन "जर तुम्हाला क्रिकेट सामने खेळवायचे नसतील तर सगळ्याच क्षेत्रात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तोडून टाकावेत,हे क्रिकेट आहे आणि आपण राजकारणाला यामध्ये आणतोय", असंही अख्तर म्हणालाय.
त्यामुळे आता शोएब अख्तरच्या या विधानांची किती दखल घेतली जाते हेच बघणं महत्वाचं असणार आहे.

web title : Shoaib Akhtar's big statement about India-Pakistan 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shoaib Akhtar's big statement about India-Pakistan