शोभा डे यांनी उडविली पोलिसांची खिल्ली; 'सोशल' टीकेचे लक्ष्य

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

शोभा डे सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहत असतात आणि टीकेचे लक्ष्य बनतात. लोकांचे त्यांच्या प्रकृतीवरून चेष्टा करणे हे शोभा डे यांच्यासाठी नवीन नाही. 

मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची खिल्ली उडविल्याबद्दल स्तंभलेखिका शोभा डे सोशल मीडियावर टीकेचे लक्ष्य बनल्या. एका जाड पोलिसाचे छायाचित्र शेअर करीत त्यांनी ट्विट केले की, "मुंबईत आज 'भारी' पोलिस बंदोबस्त आहे." 

दरम्यान, ज्या छायाचित्रावरून शोभा डे यांनी खिल्ली उडविली आहे त्यातील पोलिस मुंबईचा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी केलेल्या असंवेदनशील शाब्दिक कोटीला मुंबई पोलिसांनीही उत्तर दिले आहे. 
'श्रीमती डे, आम्हालाही शाब्दिक कोट्या आवडतात, परंतु तुम्ही ही कोटी चुकीच्या ठिकाणी केली आहे. तो अधिकारी मुंबई पोलिसांतील नाही, तसेच तो गणवेशही आमचा नाही. आम्ही तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकांकडून चांगल्या अपेक्षा करतो,' मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून डे यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

शोभा डे सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहत असतात आणि टीकेचे लक्ष्य बनतात. लोकांचे त्यांच्या प्रकृतीवरून चेष्टा करणे हे शोभा डे यांच्यासाठी नवीन नाही. 
एप्रिल 2016 मध्ये इंग्लंडच्या डचेस ऑफ केंब्रिज केट मिडल्टन भारतात आल्या होत्या. तेव्हा साडी नेसण्यासारखी केट यांची देहयष्टी नाही, असे विधान डे यांनी केले होते. केट यांनी साडी नेसली नाही ते बरे झाले, असे त्यांनी म्हटले होते. 

तसेच, अलीकडे जानेवारीमध्ये त्यांनी सुषमा स्वराज यांनी 2017 मध्ये शांत रहावे आणि ट्विट करणे बंद करावे, असे शोभा डे यांनी म्हटले होते. 
 

Web Title: shobha de slammed for making fun of mumbai police