कामचुकार कंत्राटदार हादरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नवी मुंबई - संथगतीने कामे करून महापालिकेचे प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, अशा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिला आहे. त्यामुळे अशा मंडळींचे धाबे दणाणले आहेत. पालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांची माहिती घेण्यासाठी गुरुवारी (ता. ३) आयुक्तांनी वाशी, कौपरखैरणे, नेरूळ आणि पाम बीच रस्त्यालगत सुरू असलेल्या कामांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी जे कंत्राटदार समाधानकारक काम करत नाहीत त्यांना कडक शब्दांत खडसावले. 

नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सध्या प्रशासनातर्फे मलनिःसारण वाहिन्या, रस्ते दुरुस्ती, पदपथ व गटारे बांधणे अशी कामे वेगाने सुरू आहेत. मात्र त्यांचा दर्जा राखला जात आहे की नाही, त्याची शहानिशा प्रत्येकवेळी आयुक्तांकडून केली जात आहे. त्याच पार्श्‍वभूमिवर त्यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांसह नेरूळ, वाशी व कोपरखैरणेतील नागरी कामांची पाहणी केली. वाशी सेक्‍टर ३ येथे पालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय इमारतीसाठी कंत्राटदाराच्या चालढकलपणामुळे पालिकेला वर्षभरात पुन्हा दुसरी निविदा काढावी लागली. यात खर्च वाढल्यामुळे पालिकेलाच भुर्दंड सोसावा लागला. वाशी सेक्‍टर १४ येथील बाजारातील चार मजली इमारत पाडल्यानंतर आता नव्याने बांधकाम सुरू झाले असून पहिल्या माळ्याचे काम सुरू आहे. ते संथगतीने करणाऱ्या कंत्राटदाराला प्रशासनाने साडेसहा टक्के दंड केला, अशी माहिती रामास्वामी यांनी दिली. अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे ते हादरले आहेत. 

आयुक्तांचा पाहणी दौरा
नेरूळ सेक्‍टर २ मधील एनएल वनमधील ओनर्स असोसिएशन आणि सेक्‍टर ८ मधील अण्णासाहेब पाटील माथाडी रहिवासी असोसिएशनला भेट देऊन तेथील मलनिःसारण व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांची रामास्वामी यांनी पाहणी केली. वाशी सेक्‍टर ९ मधील जेएन-२ मधील धोकादायक म्हणून घोषित केलेल्या गुलमोहर अपार्टमेंटला भेट दिली. या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पालिकेसमोर आला असून याबाबत सहाय्यक संचालक नगररचना ओवेस मोमीन यांच्यासोबत चर्चा केली. कोपरखैरणे सेक्‍टर ७ मध्येही वसाहत अंतर्गत कामांची त्यांनी पाहणी केली.  

करांमधून मिळालेल्या पैशांतून नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत; मात्र कंत्राटदारांमुळे त्यांना उशीर होत असेल तर प्रशासन ते खपवून घेणार नाही. वाशीतील निकृष्ट बांधकाम पाडून आता नव्याने बांधकाम केले जात आहे. प्रशासनाला दर्जेदार काम अपेक्षित आहे. कंत्राटदारांच्या धीम्या कामामुळे प्रकल्पांचा खर्च वाढत असून पालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त.

Web Title: shocking contractor in new mumbai