धक्कादायक : व्हेंटिलेटरवर असणारा कोरोनाचा रुग्ण हरवला ; वाचा कुठे घडलीये ही घटना

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 1 June 2020

मुंबईतील केईएम रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला असून, एक 70 वर्षीय कोरोनाचा पेशंट हरवला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला असून, एक 70 वर्षीय कोरोनाचा पेशंट हरवला असल्याचे समोर आले आहे. व्हेंटिलेटवर असलेला हा पेशंट हरविणे गंभीर बाब असून त्याला जबाबदार कोण,असा सवाल त्या पेशंटच्या कुटुंबीयांनी विचारला आहे.याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जिद्दीला सलाम! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात....

लालबाग जिजामातानगर येथे राहणारे एक 70 वर्षांचे रुग्ण 14 मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. 18 मे रोजी अचानक तब्येत खालवल्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात येवून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. या पेशंटची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्या पेशंटची पत्नी आणि मुलीला देखील घरी क्वारंटाईन करण्यात आले. 19 मे रोजी सकाळी त्या पेशंटच्या नातेवाईकांना केईएम रुग्णालयातून फोन आला. आपला पेशंट बेडवर नाही , तो  वॉर्डमधून हरवला आहे असे सांगण्यात आले. हे ऐकून नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली.  यानंतर 21 मे रोजी दोन दिवसांनी एक मृतदेह दाखवत तो त्या रुग्णाचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र तो त्यांचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

पेशंटच्या नातेवाईकांनी आपलं दुःख महागाई सारून संपूर्ण रुग्णालय शोधलं , मात्र पेशंट काही सापडले नाहीत. 10 दिवस झाले, आजपर्यंत त्या रुग्णाचा तपास सुरु आहे,ते कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही.एकीकडे कोरोनाबाधितांना उपचार कसे मिळणार याची चिंता असतानाच दुसरीकडे आता रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमैय्या यांनी देखील ट्विट करत प्रशासनाला जाब विचारला आहे.  या सगळ्याला जबाबदार कोण, याचे उत्तर रुग्णालय प्रशासनाला मात्र अद्याप सापडलेले नाही.रुग्ण कसा काय हरवला ? व्हेटिलेटरवर असलेला रुग्ण पळून तर जाऊ शकत नाही, मग याला जबाबदार कोण असा सवाल भाजपचे उपाध्यक्ष सोमैया यांनी केला आहे.

कसं होणार? 1 लाख नागरीकांसाठी फक्त 21 डॉक्‍टर; पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
 

केईएम सारख्या मोठ्या रूग्णालयातून पेशंट अश्या प्रकारे बेपत्ता होणे गंभीर आहे. रूग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा यातून समोर आला आहे.त्या पेशंटचे नेमके काय झाले त्याचा 10 दिवसानंतर ही थांगपत्ता लागलेला नाही. हा पेशंट स्वताहून गेला असेल तर तिथली सुरक्षा व्यवस्था काय करत होती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पेशंटचा मृत्यू  झाला असेल तर त्याचा मृतदेऊ कुठे आहे , त्याची नोंद का नाही , त्याचवेळी पेशंटच्या कुटुंबियांना का कळवले नाही असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत मृतदेहांची अदला बदल झाल्याचा गंभीर प्रकार देखील घडला. असा प्रकार या प्रकरणात  देखील झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रकरणात रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असून दोषींवर कारवाईची मागणी नातेवाईक अंकुश जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी केईएम रुग्णालयाचे डिन डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Corona patient on ventilator lost; Read where this incident happened