७ नंतरही दुकानं सुरु ठेवली; ठाण्यात ७२ दुकानांना टाळं, पालिकेची धडक कारवाई

राजेश मोरे
Wednesday, 30 September 2020

सायंकाळी सातनंतर उघड्या राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर काल प्रभाग समितीनिहाय शहरातील ७२ आस्थापनांवर धडक कारवाई करून आस्थापना सील करण्यात आल्यात. 

मुंबईः  कोरोनाच्या काळात लोकांना खरेदीला पुरेसा वाव मिळावा यासाठी सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली करण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात आलेली आहे. पण या परवानगीचा गैरवापर करत अनेक दुकानदार सातनंतरही दुकाने उघडी ठेवत असल्याचे निर्दशनास आले होते. या दुकानांच्या विरोधात कठोर कारवाई करुन अशी दुकाने थेट सील करण्यास महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे.

सायंकाळी सातनंतर उघड्या राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर काल प्रभाग समितीनिहाय शहरातील ७२ आस्थापनांवर धडक कारवाई करून आस्थापना सील करण्यात आल्यात. दरम्यान यापुढेही सदरची कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी महापलिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

अधिक वाचाः  महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये मुंबई शहर देशात दुसऱ्या स्थानावर

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सायंकाळी ७ पर्यंत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनंही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. तरीही काही आस्थापना ७ नंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातनंतर ज्या आस्थापना उघड्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कालपासूनच सातनंतर उघड्या राहणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

अधिक वाचाः  भिवंडीत धोकादायक इमारतींची समस्या बिकट, एकूण 527 धोकादायक इमारती

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त रोज सायंकाळी सात ते साडे सात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून  सुरू असणाऱ्या आस्थापना तसेच अन्न पदार्थाच्या स्टॅाल्सवर कारवाई करत असून काल जवळपास ७२ दुकाने सील करण्यात आलीत. मुळात दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी दुकानदारांना दुकानाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. पण त्यानंतरही काही दुकानदार नियम बाजूला सारुन विक्री करताहेत. अशातच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. महापालिकेच्या वतीने दिवसाला सुमारे सहा हजार जणांची तपासणी केली जात असून त्यापैकी किमान तीनशे जण दिवसाला पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा शहरातील व्यवहाराला शिस्त लागावी यासाठी महापालिकेकडून नियम कठोर करण्यात येताहेत.

-----------------------

(संपादनः राजेश मोरे)

Shop after 7 pm open Sealed 72 shops Thane Municipal action


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shop after 7 pm open Sealed 72 shops Thane Municipal action