प्रशासनाकडून कोटींचा खर्च; ...मात्र, लाभार्थीचं नाही!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

नवी मुंबई शहरातील निराश्रित, बेघर नागरिकांना निवाऱ्याची सोय व्हावी, याकरिता बेलापूर येथे रात्र निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, सर्व सुविधांनी सज्ज असलेले हे केंद्र पुरेशा प्रतिसादाअभावी ओस पडले आहे. 

नवी मुंबई : शहरातील निराश्रित, बेघर नागरिकांना निवाऱ्याची सोय व्हावी, याकरिता बेलापूर येथे रात्र निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, सर्व सुविधांनी सज्ज असलेले हे केंद्र पुरेशा प्रतिसादाअभावी ओस पडले आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबापुरीची गगनचुंबी वाटचाल!

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नवी मुंबईत बेलापूर येथे रात्र निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणारे; तसेच ज्यांना राहण्यासाठी निवाऱ्याची सोय नाही, अशा बेघर कुटुंबांची, नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने प्रत्येक पालिका हद्दीत अशी केंद्रे असावीत, असे सांगण्यात आले होते. राष्ट्रीय शहरी आजीविका मिशननुसार (एनयूएलएम) नवी मुंबईत १०३ बेघर नागरिक आहेत. त्यातील ८५ पुरुष व उर्वरित १८ स्त्रिया आहेत. मात्र, हा आकडा सतत बदलत असतो. कारण कामानिमित्त शहरात आलेली माणसे काही दिवसांनी इतरत्र निघून जातात वा एखादे कुटुंबही एक ठिकाणी कायम राहत नाही. अल्प प्रतिसादामुळे पावणे येथील श्रमिकनगर व तुर्भे सेक्‍टर- २१ येथील केंद्र यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. त्यानंतर बेलापूर येथे हे केंद्र उभारण्यात आले. एका एनजीओमार्फत हे केंद्र चालवले जात असून, पालिकेने नाश्‍ता व रात्रीचे जेवण वगळता सर्व सुविधा येथे पुरवल्या आहेत. कोणी मगितले तरच तेथे नाश्‍त्याची सोय केली जाते. मात्र, या सुविधेचा लाभ केवळ १० ते १५ बेघर नागरिकच घेत असल्याचे समोर आले आहे. 

ही बातमी वाचली का? तो तिला गोड बोलून घरी घेऊन जायचा आणि...

घणसोलीतील केंद्राचे हस्तांतरण रखडले
२०१७ च्या सुमारास पालिकेने घणसोली सेक्‍टर- ४ येथे आणखी एक केंद्र उभारण्यास सुरुवात केली. जवळपास सव्वादोन कोटी खर्च करून या केंद्राची इमारत उभारण्यात आलेली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या केंद्राचे अद्याप समाज विकास विभागाकडे हस्तांतरण न झाल्याने ते सुरू करण्यात आलेले नाही. या इमारतीमध्ये स्वयंपाकघर, अपंगांसाठी राहण्याची व्यवस्था, शौचालय, उपाहारगृह, कुटुंबासाठी राहण्याची व्यवस्था अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई शहरात ११ रात्र निवारा केंद्र प्रस्तावित आहेत. मात्र पावणे, तुर्भे येथील रात्र निवारा केंद्राला झालेला विरोध, त्यांना मिळालेला अल्प प्रतिसाद यामुळे ही केंद्रे बंद करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली होती. सध्या सुरू असलेल्या बेलापूर येथील निवारा केंद्राचीही तीच गत आहे. मात्र, या ठिकाणी पुरेपूर अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- क्रांती पाटील, उपायुक्त, समाज विकास विभाग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short response to night shelter center in navi mumbai