औषधाविना सुधागड तालुका खोकतोय

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

सुधागड तालुक्‍यात पाली व जांभूळपाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून खोकल्यासाठी जवळपास १ हजार औषधांच्या बाटल्यांची मागणी असते; मात्र जिल्ह्यातून केवळ २५ औषधांच्या बाटल्या पाठवल्या जातात.

पाली : सुधागड तालुक्‍यात पाली व जांभूळपाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून खोकल्यासाठी जवळपास १ हजार औषधांच्या बाटल्यांची मागणी असते; मात्र जिल्ह्यातून केवळ २५ औषधांच्या बाटल्या पाठवल्या जातात. त्यामुळे येथील रुग्णांची आरोग्य विभागाकडून अक्षरशः बोळवण होत आहे.
सध्या वातावरणात होणारा बदल आणि धुरळ्यामुळे खोकल्याच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा वेळी खोकल्यावरील औषधांची मागणी वाढली असताना दोन्ही महत्त्वाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत खोकल्याचे औषध नाममात्र उपलब्ध असणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. 

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४३ हजार ८१० इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर २८ हजार ८६१ इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. येथील गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी व सर्वसामान्य नागरिकांची उपचारासाठी संपूर्णतः मदार पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. त्यामुळे केवळ २५ खोकल्याच्या औषधांच्या बाटल्या कोणाकोणाला पुरणार? हा मोठा यक्ष प्रश्न आहे. त्यातही हजारो रुग्णांसाठी केवळ २५ बाटल्या देणे ही जिल्हा आरोग्य विभागाकडून केली जाणारी थट्टाच आहे, असे अनेकांचे मत आहे. 

औषधाच्या तुटवड्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांना खोकल्याच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. तर काहींना पदरमोड करत महागडी औषधे घ्यावी लागत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पालीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीहार यांना या संदर्भात विचारले असता, येथे खोकल्यावरील गोळ्या उपलब्ध आहेत. खोकल्यावरील औषधाच्या आम्ही १ हजार बाटल्या मागवतो; परंतु त्यापैकी आम्हाला फक्त २५ बाटल्या मिळतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला त्या पुरवता येत नाहीत. तालुक्‍याला मागणी केलेले औषध मोठ्या प्रमाणात मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. आरोग्य खात्याकडे या औषधांची मागणी करतच आहोत. त्याप्रमाणे औषध दिल्यास नक्कीच त्या औषधांचा फायदा रुग्णांना देऊ, असे सांगितले.

अत्यावश्‍यक असणारी सर्व प्रकारची औषधे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तसेच रेबीज, सर्पदंश यावरील व इतर इंजेक्‍शन्सही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्हा आरोग्य विभागालाच खोकल्यावरील औषधाच्या बाटल्यांचा (कफ सिरप) पुरवठा कमी होतो. त्यामुळे ते त्यांच्याकडे उपलब्ध साठ्यानुसार पुरवठा करतात. परिणामी, आमच्यापर्यंत कमी बाटल्या पोहचतात; मात्र खोकल्यावरील इतर औषधे उपलब्ध असल्याने रुग्णांची गैरसोय होत नाही.
- शशिकांत मढवी, तालुका वैद्यकीय अधिकारी

इतक्‍या मोठ्या प्रमाणात असलेल्या रुग्णांना अवघ्या २५ खोकल्यावरील औषधाच्या बाटल्या कशा पुरणार. कफ सिरपमुळे खोकल्यावर चांगला आराम मिळतो. त्यामुळे अधिकचे पैसे खर्च करून गोरगरीब व आदिवासी नागरिकांना कफ सिरप विकत घ्यावे लागते. त्यामुळे लवकर कफ सिरप उपलब्ध व्हावे.
- अमित गायकवाड, अध्यक्ष, भारिप, सुधागड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shortage of cuff syrup in Sudhagad