कोरोना रुग्णांसाठी आयसीयूची बेडची कमतरता, नर्सिंग होम बंद झाल्यामुळे ICU बेड्सचा तुटवडा 

भाग्यश्री भुवड
Saturday, 12 September 2020

कोविड रुग्णांचा वाढता आकडा पाहता पालिकेने खासगी नर्सिंग होम मध्ये ही कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी सोय केली होती. मात्र, गेल्या महिन्यात पालिकेने कोविड रुग्णांसाठी दिलेले नर्सिंग होम बंद केले.

मुंबई: कोविड रुग्णांचा वाढता आकडा पाहता पालिकेने खासगी नर्सिंग होम मध्ये ही कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी सोय केली होती. मात्र, गेल्या महिन्यात पालिकेने कोविड रुग्णांसाठी दिलेले नर्सिंग होम बंद केले. त्यामुळे, मुंबईत आयसीयू बेड्सची गरज वाढली असून त्याची सध्या कमतरता भासत आहे. असे जरी असले तरी कोविडसाठी तयार केलेली व्यवस्था ही सध्याच्या परिस्थितीसाठी पुरेशी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. 

मुंबईत,आतापर्यंत खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयातील आणि जम्बो सुविधा केंद्रात मिळून 1413 आयसीयू बेड्स आहेत. त्यातील फक्त 125 बेड्स रिक्त आहेत. ज्या नर्सिंग होम मध्ये 50 पेक्षा कमी बेड्स आहेत त्यांनी कोविड रुग्णां वर उपचार न करता इतर नाॅन कोविड रुग्णांवर उपचार सुरू करावेत असा निर्णय गेल्या महिन्यात पालिकेकडून घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय पालिकेला न परवडणारा असून त्यामुळे, आता आयसीयू बेड्स ची कमतरता जाणवू लागली आहे. 

गणेशोत्सव काळ आणि अनलॉक केल्यामुळे रुग्णांची संख्या मुंबईत मोठ्या संख्येने पुन्हा वाढली. त्यामुळे, ही आयसीयू बेड्स कमी पडत आहेत. एकूण 1413 सार्वजनिक रुग्णांलयांमध्ये 1413 आयसीयू बेड्स असून 33 खासगी रुग्णालयात ही बेड्स उपलब्ध आहेत. मात्र, त्यातील फक्त 125 रिक्त आहेत. एकूण 33 खासगी रुग्णालयात 590 आयसीयू बेड्स आहेत. मात्र, त्यातील 7 रुग्णालयांनी मुलुंडचे फोर्टिस, पवईतील हिरानंदानी, वांद्रे येथील लिलावती, ताडदेव मधील जसलोक, हिंदूजा, नानावटी आणि ब्रीच कॅन्डी या रुग्णालयातील डॉक्टरांनी आयसीयूचे बेड्सची गरज असणार्या रूग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. 

पालिकेने 72 नर्सिंग होम्समध्ये कोविड 19 च्या रुग्णांना दाखल करुन उपचार करण्यास बंदी घातली कारण, त्यांच्या ऑडिटमध्ये खासगी सुविधांमध्ये 41 टक्के मृत्यू ऑगस्ट महिन्याच्या मध्य काळात नोंदवल्या गेल्या. ज्या वेळेस मुंबईत एकाच दिवशी अनेक रुग्ण सापडले. बुधवारी 2,227 केसेसची नोंद केली गेली. तर, 19 दिवसातला सर्वात जास्त मृत्यू दर जो 40 होता तो ही बुधवारी नोंद केला गेला.

 टी वाॅर्ड हा मुंबईतील पहिल्या 10 कोरोनाव्हायरसचा सर्वात वाईट परिणाम झालेल्या वाॅर्डपैकी आहे. या परिसरात 50 केसेस दररोज नव्याने नोंद होत आहेत. आता फक्त एक मुलुंड चे फोर्टिस रुग्णालय, जम्बो कोविड सुविधा आणि एक सार्वजनिक रुग्णालय आहे जिथे कोरोनावर उपचार केले जातात. बाकी 4 रुग्णालयांना पालिकेने कोविडची सुविधा देऊ नये असे सांगितले. तेव्हापासून आयसीयू बेडसाठी लोकांची गर्दी वाढत आहे. जम्बो सेंटरमधील 215 आयसीयू बेड्सही अजून सुरू नाहीत. 

मिहिर कोटेचा, भाजपचे आमदार 

सध्या पॅनिक परिस्थिती नाही. 125 आयसीयू बेड्स पुरेसे आहेत. आपल्याकडे 936 व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी 69 रिक्त आहेत. तर, आणखी 250 आयसीयू बेड्सची वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 50 आयसीयू बेड्स हे याआधीच दिले गेले आहेत.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका, (आरोग्य)

--------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Shortage ICU beds due closure nursing homes For corona patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shortage ICU beds due closure nursing homes For corona patients