पाली परिसरात पेट्रोलची टंचाई

पाली : खुरावले येथील हिंदुस्थान पेट्रोलियम पंप.
पाली : खुरावले येथील हिंदुस्थान पेट्रोलियम पंप.

पाली : सुधागड तालुक्‍यात एकूण चार पेट्रोल पंप आहेत. यापैकी रासळ येथील भारत पेट्रोलियम पंप व खुरावले फाट्याजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम पंप १० ते १५ दिवसांपासून बंद आहेत. तर आरड्याची वाडी आणि आंबोले येथील इसार पेट्रोलियम पंपांवर अनियमित पेट्रोल पुरवठा सुरू आहे. पेट्रोल पंपांच्या विविध अडचणींमुळे वाहनचालकांची मात्र पेट्रोलसाठी धावाधाव होताना दिसत आहे. तालुक्‍यातील आणि येथून जाणाऱ्या सर्व वाहनचालकांकडून या पेट्रोल पंपांच्या कारभाराबाबत तीव्र संताप्त व्यक्त करण्यात येत आहे.

रासळ येथील भारत पेट्रोलियम पंप हा २४ तास सेवा पुरवणारा पेट्रोल पंप असूनही काही दिवसांपासून तेथे पेट्रोलही मिळत नाही. पंपमालकाकडे संपर्क साधला असता, भारत पेट्रोलियम पंप रिलायन्स कंपनी खरेदी करण्याच्या वाटाघाटी उच्चस्तरावर चालू आहेत. तसेच, पेट्रोल पंपमालकांना देण्यात येणारे पेमेंटही भारत पेट्रोलियम कंपनीकडून दिले गेले नाहीत. यामुळे १९ ऑक्‍टोबरपासून रासळ येथील भारत पेट्रोलियमचा बल्लाळेश्वर पेट्रोल पंप बंद आहे, असे सांगण्यात आले.

खुरावले फाटा येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप वीज खंडित झाल्यामुळे सुमारे एक ते दीड महिन्यापासून बंद आहे. या पंपावर काम करणाऱ्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, परतीच्या पावसात खुरावले फाटा येथील ट्रान्सफॉर्मरवर वीज पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण सुधागड पाली यांच्या कार्यालयात अनेक दिवसांपासून तक्रार करत आहोत. तरी आजपर्यंत महावितरणकडून नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात आला नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

या बरोबरच इतर दोन पेट्रोल पंपांवर पेट्रोल अनियमित मिळत आहे. यातील आंबोले येथील पेट्रोल पंपावर रात्री पेट्रोल दिले जात नाही. परिणामी, पेट्रोल पंपाच्या अडचणींमुळे सुधागड तालुक्‍यासह येथून जाणारे वाहनचालक, तसेच पर्यटक व भाविकांची खूप गैरसोय होत आहे. 

अनेकांची गैरसोय
सुधागड तालुक्‍यातून खोपोली-पाली-वाकण हा राज्य महामार्ग ५४८ अ जातो. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक नियमित सुरू असते. कोकणाकडे जाण्यासाठी मुंबई, पुणे येथील वाहनचालक याच महामार्गाचा वापर करतात. पाली हे अष्टविनायकांचे ठिकाण येथेच आहे. त्यामुळे पाली शहरामध्ये दररोज बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त भाविक येतात. पालीसह तालुक्‍यातील नागरिकांनाही पेट्रोलची गरज आहे. या सर्वांची गैरसौय पेट्रोल पंप बंद असल्यामुळे होत आहे.

ऐन दिवाळीच्या काळात खुरावले फाटा येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप बंद होता. यामुळे या पंचक्रोशीतील वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे.
- अमित गायकवाड, अध्यक्ष, भारिप, सुधागड तालुका

परतीच्या पावसामुळे वीज पडून खुरावले फाटा येथील ट्रान्स्फार्मर जळाला आहे. सुधागड पाली महावितरण कार्यालयाकडे नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत आम्ही दररोज दोन हजार रुपयांचे डिझेल खर्च करून जनरेटरवर वाहनचालकांना पेट्रोल देत आहोत. यामुळे पेट्रोल पंपमालकाला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. मात्र, ही सेवा आम्ही पूर्ण वेळ देऊ शकत नाही.
- संदीप जाधव, व्यवस्थापक, हिंदुस्थान पेट्रोल पंप

महावितरणकडून खुरावले फाटा येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर लावण्यासाठी गेलो होतो; परंतु ट्रान्स्फॉर्मर बसवण्याच्या जागी चिखल असल्यामुळे हायड्रा गाडी फसली होती. त्यामुळे ट्रान्स्फार्मर बसवण्यात आला नाही.
- महेश गवारी, सहायक अभियंता, वीजवितरण

पेट्रोल पंपमालकांची बैठक बोलवली आहे. त्यांना असणाऱ्या समस्या लवकर सोडवण्यात येतील. त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच, वाहनचालकांची होणारी गैरसोयही दूर करण्यात येईल.
- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, सुधागड-पाली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com