कचरा डब्यांच्या तुटवड्याने उडाली नगरसेवकांची झोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - पालिका निवडणूक जवळ येत आहे तसे विविध मुद्द्यांवरून नगरसेवक चर्चेत येत आहेत. प्रत्येक नगरसेवकासाठी कचरा डब्यांच्या खरेदीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली आहे. तरीही अनेकांना कचरा डबे मिळालेले नसल्याने अनेक विभागांत कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. परिणामी, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांची झोप उडाली आहे. त्याचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. लवकरच कचरा डबे पुरविले जातील, अशी ग्वाही पालिका प्रशासनाने दिली.

कचऱ्यासाठी 10 पासून 240 लिटरपर्यंतच्या डब्यांची मागणी नगरसेवकांनी केली आहे. सुमारे 10 लाख कचरा डबे तयार करण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख डब्यांचा पुरवठा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे डबे उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यावर स्थायी समितीत रमेश कोरगावकर यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावर आज स्थायी समितीत चर्चा रंगली.
निवडणूक जवळ येऊ लागली असताना प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. विभागातून कचरा गोळा करण्यासाठी कचऱ्याचे डबे नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. नगरसेवकांना त्याचा सामना करावा लागत असल्याने त्यांची झोप उडाली आहे. लवकर डबे पुरवा, अशी मागणी आज कोरगावकर यांनी केली. कचऱ्याचे डबे का पुरविले जात नाहीत? डबे पुरविण्यात काय अडचण आहे? असे सवाल मनसेचे संतोष धुरी यांनी केला. विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी डबे देण्यात दिरंगाई का होत आहे अशी विचारणा केली. नगरसेवकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तातडीने कचऱ्याच्या डब्यांचा पुरवठा करा, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला दिले.

तातडीने डबे पुरवू
काही नगरसेवकांना कचऱ्याचे डबे देण्यात आले आहेत. ज्या नगरसेवकांना डबे मिळालेले नाहीत, त्यांना ते तातडीने दिले जातील अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी समितीच्या बैठकीत दिली.

Web Title: shortage of waste can