राज्यात 'खरे हिंदुत्व' दाखवत मदरसे बंद करून शिष्यवृत्ती द्या: अतुल भातखळकर

कृष्ण जोशी
Thursday, 15 October 2020

मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदरशातील विद्यार्थ्यांना सरकारने थेट शिष्यवृत्ती स्वरुपात मदत देऊन फक्त धार्मिक शिक्षण देणारे मदरसे बंद करावेत, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई:  मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदरशातील विद्यार्थ्यांना सरकारने थेट शिष्यवृत्ती स्वरुपात मदत देऊन फक्त धार्मिक शिक्षण देणारे मदरसे बंद करावेत, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. असा निर्णय घेणाऱ्या आसाम सरकारचेही भातखळकर यांनी अभिनंदन केले आहे. 

हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी करदात्यांच्या पैशांवर चालणारे आणि धार्मिक शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. या विषयावर त्यांनी व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

अधिक वाचाः  एकच... पण सॉलिड मारला, भाजपला सामनातून ठाकरी दणका

महाराष्ट्रातील मदरशांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका धर्माचे शिक्षण दिले जाते. राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारे हे प्रकार अत्यंत चूक असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे आणि तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवावी. तसेच मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी अशी मागणीही भातखळकर यांनी केली.

अधिक वाचाः  विधानपरिषद नियुक्तीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी, चार नावे कुणाची?

शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी यांनी तर सर्व राज्यांनी मदरशांवर बंदी घालून मुस्लिम विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याची सोय करावी अशी मागणी केल्याचेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणाच्याही दबावाला बळी न पडता हा धाडसी निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. कालच आसाम सरकारने आसाममधील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून आसाम सरकारच्या या निर्णयाचे भातखळकर यांनी स्वागत केले.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Showing true Hindutva in state close madrassas and give scholarships  Atul Bhatkhalkar demand


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Showing true Hindutva in state close madrassas and give scholarships Atul Bhatkhalkar demand