दिघ्यातील पदपथांवर भंगार माफियांकडून अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरातील दिघा बाबा मंदिर ते संजय गांधी नगरपर्यंतच्या रस्त्यावरील पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरातील दिघा बाबा मंदिर ते संजय गांधी नगरपर्यंतच्या रस्त्यावरील पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. राजकीय नेत्यांच्या फलकांचा आधार घेत भंगार माफियांनी या ठिकाणच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून रस्ता गिळंकृत केला आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सर्वच गाळेधारकांनी या ठिकाणी रस्ता गिळंकृत केला आहे. ऐरोली व दिघा विभागातील हद्दीच्या वादात पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या भंगार माफियांचे मात्र चांगभले झाले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील संजय गांधीनगर परिसरात भंगार माफिया म्हणून ओळख असणाऱ्या एका राजकीय नेत्याने रस्त्यालगतच हॉटेल आणि आपले राजकीय जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. रस्त्यालगत असणाऱ्या दुकानांवर त्याचा वरदहस्त असल्याने लाकडी वखार, मटण विक्रेते व इतर व्यावसायिकांनी बिनधास्तपणे पदपथावर अतिक्रमण केले आहे. या मार्गावरून जाण्या-येण्यासाठी नागरिकांना पदपथ शोधावे लागत आहेत; तर सर्वच दुकान व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमण करत आपले दुकान थाटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होते. 

राजकीय वरदहस्त असल्याने अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या व पदपथ गिळंकृत केलेल्या हॉटेल व कार्यालयावर कारवाई करण्यात येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. संध्याकाळच्या वेळेला अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या कार्यालयाच्या बाहेरच बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. हे कार्यकर्ते संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी खुर्च्या टाकून ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या-येणाऱ्या महिलांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. 

हद्दीवरून अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
या संदर्भात दिघा विभाग अधिकारी प्रियांका काळसेकर यांच्याशी संपर्क साधला असता संजय गांधी नगर हा परिसर ऐरोली विभाग कार्यालयांतर्गत येत असल्याने अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी ही ऐरोली विभागाची आहे, तर ऐरोलीचे विभाग अधिकारी अनंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत हा भाग येत असल्यास तेथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ऐरोली नाक्‍यावरून दिघ्याकडे जाताना संजय गांधीनगर ते दिघा बाबा मंदिरापर्यंत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावर अतिक्रमण केल्यामुळे नाइलाजास्त्व रस्त्यावरून पायी जावे लागते.
- राकेश म्हात्रे, नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the sidewalk Encroachment by wrecked mafias