तब्बल 28 वर्षांनंतर उल्हासनगरमध्ये सिग्नल यंत्रणा सुरू; वाहतूक कोंडीवर नियंत्रणामुळे शहरवासीयांना दिलासा

दिनेश गोगी
Sunday, 27 September 2020

तब्बल 28 वर्षांच्या तपानंतर उल्हासनगर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पाचवीला पुजलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण येणार आहे. 

उल्हासनगर : तब्बल 28 वर्षांच्या तपानंतर उल्हासनगर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पाचवीला पुजलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण येणार आहे. 

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेसनेत्याची खोचक टीका

एमएमआरडीएच्या वतीने उल्हासनगरमार्गे कल्याण-बदलापूर महामार्गाचे काम सुरू आहे. पुढे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी सिग्नल यंत्रणेबाबत महापौर लीलाबाई आशान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. याबाबत एमएमआरडीएला माहिती देण्यात आल्यावर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लालबहादूर शास्त्री चौक, फॉरवर्ड लाईन या तीन ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे.

पालिकेतील विद्युत विभागाचे अभियंता हनुमंत खरात, उपअभियंता महेंद्र दिंडे आणि टेक्निशियन गोविंद पिंपरकर यांनी एमएमआरडीएच्या टीमला सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी सहकार्य केले आहे. सध्या या यंत्रणेची ट्रायल घेण्यात येत असून लवकरच ती कार्यरत होणार आहे. पुढे वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, याकरिता पालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी सांगितले.

'पंचवीस वर्षांची शिवसेनेची मजबुरी काय? हे राऊत यांनी उघड करावे'; भाजप नेत्याचा सवाल

पूर्वीच्या यंत्रणेकडे दुर्लक्ष
विकासाचा पाया रचतानाच पहिल्यांदा डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणारे पप्पू कालानी यांच्या 1987 ते 91-92 कालावधीत शहरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र त्यांची निगा राखली न गेल्याने सर्व सिग्नलची दुरवस्था होऊन ते काढून टाकण्यात आले. ही यंत्रणा पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लालबहादूर शास्त्री चौक, फॉरवर्ड लाईन, नेहरू चौक, शहाड, बिर्ला गेट आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signal system started in Ulhasnagar after 28 years