esakal | ठसका गायब! मुंबईतील प्रसिद्ध मसाला बाजार पडलाय ओस...
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित

मार्च ते मे या काळात साठवणीचा मसला तयार केला जातो. मिरची आणि अन्य मसाले खरेदी करण्यासाठी लालबाग आणि मशीद बंदर येथील बाजारांत गर्दी होते. मुंबईतील वेगवेगगळे भाग, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई, विरार येथून वर्षभराचा मसाला कुटून घेण्यासाठी लोक लालबागला येतात. त्यामुळे या काळात लालबाग मार्केट गजबजलेले असते. कोरोनामुळे या बाजारपेठा सुनसान झाल्या असल्या, तरी मिरचीच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.

ठसका गायब! मुंबईतील प्रसिद्ध मसाला बाजार पडलाय ओस...

sakal_logo
By
उत्कर्षा पाटील

मुंबई : मार्च ते मे या काळात साठवणीचा मसला तयार केला जातो. मिरची आणि अन्य मसाले खरेदी करण्यासाठी लालबाग आणि मशीद बंदर येथील बाजारांत गर्दी होते. मुंबईतील वेगवेगगळे भाग, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई, विरार येथून वर्षभराचा मसाला कुटून घेण्यासाठी लोक लालबागला येतात. त्यामुळे या काळात लालबाग मार्केट गजबजलेले असते. कोरोनामुळे या बाजारपेठा सुनसान झाल्या असल्या, तरी मिरचीच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. 

क्लिक करा : मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय, सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली

लालबाग मिरची, मसाला मार्केटमध्ये एप्रिल ते मे या काळात हजारो ग्राहकांची वर्दळ असते. या तीन महिन्यांत मिरची व मसाले व्यापाऱ्यांची कमाई सर्वांत जास्त होते. मसाला कुटण्यासाठी डंकांवर सकाळपासून ग्राहकांच्या रांगा लागतात.

या वर्षी लॉकडाऊनपूर्वी मिरच्या 15 ते 20 टक्क्यांनी महागल्या होत्या. 220 रुपये किलो दराने मिळणारी मिरची 260 ते 280 रुपयांवर, तर रंग नेहमी लालच राहणारी एक नंबर दर्जाची मिरची 360 रुपयांवर गेली होती, अशी माहिती लालबाग येथील मसाले व मिरची व्यापारी बबन चव्हाण यांनी दिली. 

लॉकडाऊनमध्ये तर मिरचीचे दर दुप्पट झाले आहेत. मुख्य बाजारपेठेत मिरचीची आवकच होत नसल्याने भाव वाढले आहेत. पूर्वी प्रतिकिलो 280 रुपये दराने मिळणारी मिरची आता 400 रुपयांना विकली जात आहे, असे जी. डब्ल्यू. खामकर मसाला कंपनीचे संकेत खामकर यांनी सांगितले.

आम्ही जानेवारी-फेब्रुवारीतच मिरची खरेदी करून ठेवतो. मागील वर्षी हजार रुपयांमध्ये तयार होणाऱ्या मसाल्यासाठी आता ग्राहकांना दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत, असे ते म्हणाले. 

अनेकांच्या घरातील साठवणीचा मसाला संपत आला आहे. परंतु, कोरोनामुळे संचारबंदी असल्याने ग्राहक दुकानांत जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मसाला कसा करायचा, अशी चिंता गृहिणींना सतावत आहे. 

क्लिक करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी 'गूड न्यूज' लवकरच येणार

सध्याचे संकट जूनपर्यंत तरी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यावर मसाला तयार करता येणार नाही. मसाला कुटण्याबाबत ग्राहकांचे दूरध्वनी येऊ लागले. त्यामुळे काही मसाला व्यापाऱ्यांनी ग्राहकांना घरपोच मसाला देण्याची सेवा सुरू केली, असे खामकर यांनी सांगितले. 

घरपोच सेवा
मिरच्या वाळवण्यासाठी जागा आणि मसाला कुटण्याच्या मशीन असल्यामुळे ग्राहकांना घरपोच मसाला पोहोचवणे शक्य होते. लॉकडाऊन असल्याने कामगार येथेच राहतात. दुकान व मसाला कुटण्याच्या यंत्रांचे नियमित सॅनिटायझेशन केले जाते. 

आठवडाभरात मसाला ग्राहकांच्या घरी पोहोचवला जातो. दररोज सुमारे 30 ग्राहकांच्या ऑर्डर नोंदवल्या जातात. आमचे सुमारे 5000 नेहमीचे ग्राहक आहेत; मात्र दुकानात येऊन खरेदी करणे आणि दूरध्वनीवरून मागणी नोंदवणे यांत फरक पडतो. या वर्षी आम्हाला 50 ते 60 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. 
- संकेत खामकर, व्यापारी
जी. डब्ल्यू. खामकर मसाला

सुरक्षितता महत्त्वाची म्हणून 19 मार्चपासून दुकान बंद आहे. मसाला व मिरची खरेदीसाठी अनेक ग्राहकांचे दूरध्वनी येतात. एक हजार ते 2000 किलोचा माल पडून असल्याने नुकसान होत आहे. काही काळाने मिरची काळी व पांढरी पडते, याची चिंता आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करून हे पदार्थ साठवून ठेवण्याचे आव्हान आहे
- बबन चव्हाण
मसाला व्यापारी 

loading image