
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा सिंदूर उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीची कार्यवाही आव्हानात्मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने यशस्वीपणे पूल उभारणी केली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे त्यांनी स्पष्ट केले. आज या पूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.