शीव-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

सार्वजनिक बांधकाम विभागाने शीव-पनवेल महामार्गावर बांधलेले चार भुयारी मार्ग दुरवस्थेमुळे बंद आहेत. नवी मुंबई पालिकेने जनहिताच्या दृष्टीने ३० लाख रुपये खर्च करून त्यांची काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती केली होती.

नवी मुंबई - सार्वजनिक बांधकाम विभागाने शीव-पनवेल महामार्गावर बांधलेले चार भुयारी मार्ग दुरवस्थेमुळे बंद आहेत. नवी मुंबई पालिकेने जनहिताच्या दृष्टीने ३० लाख रुपये खर्च करून त्यांची काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती केली होती. परंतु त्यांची पुन्हा दयनीय अवस्था झाली आहे. बांधकाम विभागाच्या बेपर्वा वृत्तीमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन सध्या या ठिकाणी महामार्ग ओलांडावा लागत आहे. 

नवी मुंबईतून शीव-पनवेल महामार्ग जातो. हा मार्ग ओळांडणे हे पादचाऱ्यांच्यासाठी धोकादायक आहे. त्याचा विचार करून बांधकाम विभागाने चार ठिकाणी भुयारी मार्ग बांधले आहेत. जुईनगर-शिरवणे येथे एक, नेरूळ एलपीजवळ दोन आणि उरण फाट्याजवळील एसबीआय कॉलनीशेजारी एक असे ते आहेत. मात्र  देखभालीअभावी त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारे बांधकाम साहित्य जाऊन हे भुयारी मार्ग कायमचे बंद पडण्याच्या अवस्थेत होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी अभियांत्रिकी विभागाला सूचना देऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वीच पालिकेने दुरुस्ती, रंगरंगोटी करून उजेडासाठी दिवे बसवले. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून तीन सक्‍शन पंप बसवले. 

पालिकेने काही भागात गर्दुल्ले व नशेबाजांचा वावर वाढू नये म्हणून सीसीटीव्हीदेखील बसवण्यात येणार होते. परंतु पुन्हा या मार्गांची दयनीय अवस्था झाली आहे. नेरूळ येथील दोन्ही भुयारी मार्गांचे दरवाजे बंद केले आहेत.  त्यामध्ये पाणी घुसल्याने ते बंद केल्याचे एका पादचाऱ्याने सांगितले. एसबीआय कॉलनीसमोरील भुयारी मार्गातील वीज गायब आहे. 

नेरूळ एलपी येथून रस्ता ओलांडताना अवजड वाहनांमुळे अपघाताची भीती वाटते. अशा परिस्थितीत भुयारी मार्ग सोईचा ठरू शकतो. काही दिवसांपूर्वी तो सुरू होता. आता बंद आहे. 
- सचिन तांबे, नेरूळ रहिवासी

नागरिकांच्या सोईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेली चार भुयारी मार्गांची दुरुस्ती केली होती; परंतु पुढे त्याची देखभाल करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. 
- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, पालिका

बांधकाम विभाग हतबल
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या चारही भपयारी मार्गांच्या दुरुस्ती-देखभाल करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याची माहिती उपअभियंता आर. पी. पाटील यांनी दिली. भुयारी मार्गांच्या सुरक्षेसाठी काही सुरक्षा रक्षक तैनात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे पुढील आर्थिक वर्षासाठी सुरक्षा रक्षकांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तरतबद केल्याची माहिती पाटील यांनी दिली. प्रवाशांनीही या भुयारी मार्गाचा वापर करणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sion-Panvel highway subway close